दहीहंडी रचताना थर अचानक कोसळला आणि एक गोविंदा जायबंदी झाला. त्याला घेऊन इतर गोविंदांनी केईएम रुग्णालयात धाव घेतली. ही घटना दोन वर्षांपूर्वीची. पण दहीहंडीला त्या कुटुंबाने रामराम ठोकला तो कायमचाच!
मुंबईमधील नामांकित गोविंदा पथकांमधील एक फेरबंदर, शिवडीमधील सह्य़ाद्री गोविंदा पथक. दोन वर्षांपूर्वी एक दहीहंडी फोडण्यासाठी सहा थर लावण्यात येत होते. दहीहंडी सहाव्या थरावरील गोविंदाच्या अगदी हाताजवळ आली असतानाच थर कोसळले आणि अनिल पवार हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ केईएममध्ये नेण्यात आले. मानेच्या हाडाला दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. अनिलच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी सह्य़ाद्री गोविंदा पथकाकडून मदतीचा हात देण्यात आला.
या घटनेनंतर पथकातील अन्य गोविंदा आणि त्यांचे पालक धास्तावले होते. परिणामी गेल्या वर्षी पथकातील गोविंदांची संख्या अचानक रोडावली. सहा थरांची हंडी फोडण्यासाठीही पथकातील गोविंदांची संख्या तोकडी पडली. या प्रकाराबाबत पथकातील पदाधिकाऱ्यांनी पथकात सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या घरी विचारपूस केली. तेव्हा जीवघेण्या दहीहंडी उत्सवाला पालकांचा विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अखेर पथकातील मुख्य पदाधिकाऱ्यांनी चिंतन बैठक आयोजित करून सर्वाचे मत आजमावले आणि अखेर सर्वानुमते गोविंदा पथक बंद करण्याचा निर्णय घेतला. आता दहीहंडी उत्सवाऐवजी गणेशोत्सव दणक्यात साजरा करण्याचा निर्णय या सर्वानी घेतला आहे. न्यायालयाने आता दहीहंडीची उंची २० फुटांपेक्षा अधिक नसावी, असे आदेश दिले आहेत. पण तरीही हा उत्सव जीवघेणा आहे. एकंदर परिस्थितीचा विचार करून आम्ही या वर्षीपासून गोविंदा पथक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी गणेशोत्सव मोठय़ा दणक्यात साजरा करण्याचा आमचा मानस आहे, असे सह्य़ाद्री गोविंदा पथकाचे प्रमुख विशाल शेलार यांनी सांगितले.

Story img Loader