शिकून खूप मोठी होण्याचे मुलीचे आणि तिला खूप शिकविण्याचे तिच्या आईचे स्वप्न काळाच्या रूपाने आलेल्या एस.टी. बसने क्षणात हिरावून नेले.
सिग्नलवर उभ्या एसटी बसच्या धडकेने स्कुटीस्वार महिला व तिच्या मुलीचा मृत्यू झाला. एलआयसी चौकात मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने सारेच हळहळले. लक्ष्मी मोरेश्वर पेगडवार व त्यांची मुलगी अंकिता (रा. खलाशी लाईन) ही ठार झालेल्या माय-लेकींची नावे आहेत.
बारा वर्षांची अंकिता प्रॉव्हिडन्स स्कुलमध्ये सातव्या वर्गात शिकत होती. आज नेहमीप्रमाणे तिची शाळा सुटल्यानंतर लक्ष्मी तिला घेण्यासाठी शाळेत गेली होती. शाळा सुटल्यानंतर स्कुटीने (एमएच/३१/डीडब्लु/१९६५) त्या दोघी निघाल्या. लिबर्टी टॉकीजमार्गे त्या दोघी एलआयसी चौकात आल्या. लाल दिवा असल्याने स्कुटी थांबली. मागे दोन-तीन पावलांवर काटोलहून येत असलेली एस.टी. बस (एमएच/१२/ईएफ/६७४७) उभी होती.
हिरवा दिवा सुरू झाल्यानंतर मागील बस चालकाने बस सुरू करताच ती उसळली आणि तिने स्कुटीला धडक दिली. या अपघातात लक्ष्मी जागीच ठार झाली. अपघात झाल्याचे दिसताच तेथे तैनात वाहतूक पोलीस शिपाई व लोक धावले. नियंत्रण कक्षाला सूचना देत पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेतील अंकिताला तातडीने मेयो रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या अपघातामुळे तेथील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली. अपघात झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजरत्न बन्सोड यांच्यासह सदर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी बस चालक विकास गजभिये याला ताब्यात घेतले.
अपघात झाल्याचे समजताच बेझलवार कुटंब तसेच त्यांचे नातेवाईक व शेजारी घटनास्थळी पोहोचले. घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे त्यांना शोकावेग आवरला नाही. तिला शिकविण्याचे लक्ष्मीचे तसेच शिकून खुप मोठे होण्याचे अंकिताचे स्वप्न होते. मात्र, नियतीला हे मंजूर नसावे. 

Story img Loader