वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली ‘हिरो’गिरी कशी असते हे दाखवून दिले. डेव्हिड धवन यांनी वरूणसाठी ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटाचा घाट घातला आहे. यात वरूणबरोबर एक नव्हे तर इलियाना आणि नर्गिस अशा दोन-दोन नायिका आहेत. मात्र, आपल्याच तथाकथित अभिनयात दंग असणाऱ्या वरूणला चित्रिकरणादरम्यान इलियानाने संभाव्य अपघातापासून वाचवले.
‘मै तेरा हिरो’ चित्रपटाच्या नावातच हिरो असल्याने वरूणला पडद्यावरती हिरोगिरी करण्यासाठी काही स्टंट्स करणे आवश्यक होते. त्यानुसार एका दृश्याच्या वेळी वरूणला नायिकेच्या गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी उडी घ्यायची होती. मात्र, हे दृष्य देताना ज्या जागेवरून त्याला उडी मारायची होती ती जागा आणि गॅलरी दोन्ही निसरडय़ा होत्या.
वरूणच्या दृश्याआधी काही मिनिटे इलियानाचे चित्रिकरण सुरू असताना तिच्या ही गोष्ट लक्षात आली. या जागेवरून उडी मारताना वरूणचा पाय घसरेल आणि तो गॅलरीच्या रेलिंगवर वाईटरित्या आपटून खाली पडेल, हे जाणवताच इलियानाने चित्रिकरण थांबवले. तिने दोन्ही जागा साफसूफ करून कोरडय़ा करायला लावल्या आणि मगच वरूणचे दृष्य चित्रित झाले.
इलियानाने जर त्या गोष्टी केल्या नसत्या तर आपली काय स्थिती झाली असती या कल्पनेने हबकलेल्या वरूणला त्याच्यापेक्षा काही चित्रपटांनी अनुभवी असलेल्य इलियानाने चार गोष्टीही ऐकवल्या. ‘मी चित्रिकरण करत असताना सेटवर काय आहे, नाही याबाबत फार दक्ष असते. वरूणचे तसे नाही. सेटवर आल्या आल्या तो भूमिकेत शिरतो हे म्हणायला ठीक आहे. पण, आज तीच गोष्ट त्याच्या जीवावर बेतू शकली असती’. इलियानाच्या कृतीने तिच खरी त्या सेटवरची हिरो झाली होती. पण, तिच्या या हिरोगिरीने आधीच नरमलेल्या वरूणने तिचे तिखे बोल ऐकल्यावर तर बोलतीच बंद झाली होती.
मै तेरी ‘हिरो’ चित्रिकरणादरम्यान वरूणला इलियानाने संभाव्य अपघातापासून वाचवले
वडिलांचे बॅनर आणि चॉकलेटी चेहरा याच्या जोरावर हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या वरूण धवनला त्याच्याच सेटवर त्याच्या नायिकेने वास्तवातली ‘हिरो’गिरी कशी असते हे दाखवून दिले.
First published on: 05-03-2014 at 07:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident on set of main tera hero