लोकपाल विधेयकातील ज्या तीन मुद्यांसाठी अण्णा हजारे यांनी आंदोलन केले, ते तीन वादग्रस्त मुद्दे मंजूर झाले नाहीत, तरीही अण्णा हजारे यांनी या विधेयकाला कसा पाठिंबा दिला, याचे आश्चर्य वाटत असल्याचे मत ‘आम आदमी पक्षा’चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मयंक गांधी यांनी रविवारी औरंगाबाद येथे व्यक्त केले. शहरातील सीमान्त मंगल कार्यालयात ‘आप’च्या कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
 अण्णा हजारे सध्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांला हाडतुड का करतात, असे विचारले असता पक्षाच्या समन्वयक अंजली दमानिया म्हणाल्या, की वडिलांनी मुलांना रागवले तर मुलाने चिडायचे नसते. त्यांचे ते रागावणे तात्कालिक होते, असेही त्या म्हणाल्या. याच प्रश्नावर मयंक गांधी यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. ते म्हणाले, लोकपाल विधेयक मंजूर करताना ज्या तीन मुद्यांवर मतभेद होते, ते मुद्दे मंजूर झालेच नाहीत. मग या विधेयकाला अण्णांनी पािठबा कसा दिला, हे समजत नाही. असे वाटते, की अण्णांना कोणीतरी ‘बहकवत’ आहे. त्यांच्या भोवतालचे लोक त्यांचे कान भरत आहेत, असे मयंक गांधी म्हणाले.
 राज्यातील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी व विरोधकात सामंजस्य असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केले. गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्याविरोधात कधीही तुल्यबळ उमेदवार दिला जात नाही. महत्त्वाचे नेते निवडून आणण्याचा हा डाव या वेळी उधळून टाकला जाईल. आम आदमी पार्टी सक्षम उमेदवार देईल, त्यासाठी नियोजन सुरू झाल्याचे दमानिया यांनी सांगितले. रविवारच्या बठकीत दिल्लीच्या निवडणुकीचे अन्वयार्थ समजून घेणे, निवडणुकीच्या उमेदवाराची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. ठरणाऱ्या रणनीतीची माहिती सोमवारी देऊ, असे दमानिया म्हणाल्या.

Story img Loader