सिन्नर पोलीस ठाण्यातील कोठडीच्या छताची कौले काढून गुरुवारी मध्यरात्री एका दरोडेखोराने शिताफीने पलायन केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या वेळी त्याच्या साथीदाराचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला की दरोडेखोराने पळताना त्यालाही अंधारात ठेवले, याची स्पष्टता झालेली नाही. कोठडीच्या बंदोबस्तासाठी चार पोलीस तैनात असताना हा प्रकार घडला. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी संशयिताच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, कामात निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
सिन्नर पोलीस ठाण्याच्या आवारात गुन्हेगारांना ठेवण्यासाठी कोठडी आहे. पोलीस व न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुन्हेगारांना या ठिकाणी ठेवले जाते. पक्क्या स्वरूपाच्या कोठडीत न्यायालयीन कोठडीत असणारे गुन्हेगार तर त्याबाहेरील पडवीत पोलीस कोठडीतील गुन्हेगार ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. पोलीस कोठडीत असणाऱ्या राजेश ठाकूरने पडवीच्या छताची कौले काढून रात्री दोन ते सकाळी चार या कालावधीत पलायन केल्याचे निष्पन्न झाले. पहाटेच्या सुमारास हा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन शोध मोहीम सुरू केली. परंतु, ठाकूर पळून जाण्यात यशस्वी झाला. साधारणत: तीन महिन्यांपूर्वी सिन्नर शहरातील वाहनांच्या दालनामधून नवी कोरी अल्टो मोटार त्याने लंपास केली होती. या मोटारीवर बनावट क्रमांक टाकून त्याने पुण्यात तिचा वापर केला.
पिंपरी-चिंचवड येथे या मोटारीच्या साहाय्याने त्याने दरोडा टाकला. त्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ठाकूरला अटक केली होती. या संशयिताकडे असणाऱ्या चोरीच्या मोटारीचा गुन्हा सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने त्याचा छडा लागल्यानंतर २८ एप्रिलला सिन्नर पोलिसांनी ठाकूरला त्याच्या साथीदारासह ताब्यात घेतले होते.
उपरोक्त प्रकरणात न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगी केली होती. सिन्नर पोलीस ठाण्याच्या कोठडीत असताना तो पळून गेल्याने पोलीस दलावर नामुष्कीची वेळ ओढावली आहे. मध्यरात्री कोठडीच्या बंदोबस्तासाठी चार पोलीस कर्मचारी तैनात होते. परंतु कोणताही आवाज न करता अतिशय शिताफीने तो गायब झाला. महत्वाची बाब म्हणजे, मोटार चोरीच्या प्रकरणात अटकेत असणारा त्याचा साथीदार पळण्यात यशस्वी झाला नाही अन्यथा त्यालाही ठाकूरने थांगपत्ता लागू दिला नाही. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सिन्नरला धाव घेऊन संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. या घटनेची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार आहे. त्यात पोलीस कर्मचारी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.