एकतर्फी प्रेमप्रकरणातून जरिपटका भागातील एका युवकाने १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आणि तिच्या मित्रावर गुरुवारी रात्री धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याने या भागात खळबळ उडाली. हल्ला करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही तरुणी आणि आरोपी संजय विश्वकर्मा हुडको कॉलनी परिसरात राहणारे आहेत. एकाच वस्तीत राहत असल्यामुळे दोघांची अनेक दिवसांपासून मैत्री होती.  संजय तिच्यावर प्रेम करीत होता मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. दोघेही एकाच महाव्द्यिालयात शिक्षण घेत होते. गुरुवारी सायंकाळी सदर तरुणी आणि तिचा मित्र अभिलाष दुचाकीने जात असताना जरिपटका भागातील बजाज महाविद्यालयासमोर संजयने त्यांना अडविले आणि ‘तू माझ्यावर प्रेम का करीत नाहीस?’ म्हणून विचारणा केली. मात्र तिने काहीही बोलण्यास नकार देत ‘आम्हाला जाऊ दे’, म्हणून विनंती केली.
अभिलाषने त्याला समजविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यासोबत संजयची वादावादी झाली. त्यामुळे संतापलेल्या संजयने सदर तरुणीला गाडीवरून खाली पाडून पाठ, पोट आणि पायावर चाकूने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेती तरुणीला वाचविण्यासाठी अभिलाषा धावला तेव्हा संजयने त्याच्या हातावर आणि पोटावर वार केले. ही घटना असताना परिसरातील लोक धावले मात्र आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला. परिसरातील नागरिकांना दोघांना तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Story img Loader