राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र प्रांत रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या श्रीगुरुजी राष्ट्रीय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी आचार्य किशोर व्यास, डॉ. हिंमतलाल बावस्कर व चंद्रकांत नाईक यांची निवड झाली आहे. रविवारी ३ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरात होणार आहे.
पुरस्काराचे यंदाचे १८ वे वर्ष आहे.  ३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिंदे चौकातील शिवस्मारकाच्या प्रांगणात ख्यातनाम संस्कृत पंडित तथा विश्वसंस्कृत प्रतिष्ठानचे महामंत्री पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. प्रत्येकी ५१ हजार रोख, मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार निवडीची घोषणा रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
समाजसेवा, साहित्य, कला, शौर्य, कृषी, समाजप्रबोधन, अनुसंधान व धर्मसंस्कृती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविले जाते. आचार्य किशोर व्यास यांना धर्मसंस्कृतीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. डॉ. हिंमतलाल बावस्कर (महाड) यांना अनुसंधान क्षेत्रात तर चंद्रकांत नाईक यांना कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळय़ाप्रसंगी संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मधूभाई कुलकर्णी यांचे प्रमुख भाषण होणार असल्याचे डॉ. साताळकर यांनी सांगितले. या वेळी संघाचे जिल्हा संघचालक दामोदर दरगड, स्वागत समितीचे अध्यक्ष पूर्णचंद्र राव, अरुण दाते आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा