पोलीस भरतीत खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणात यापुढे आंतरविद्यापीठ स्तरावर कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंनाही समाविष्ट करण्यात येईल, असा निर्णय क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी शनिवारी येथे जाहीर केला. येथे आयोजित राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पध्रेतील खुल्या गटात मुंबईच्या शोजी मॅथ्यू याने बाजी मारली.
राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी येथील स्टेडियम मदानावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पध्रेचे उद्घाटन वळवी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार कुंडलिक नागरे, टी. पी. मुंडे, मनपा गटनेते भगवान वाघमारे, मेघना बोर्डीकर आदी उपस्थित होते. मंत्री वळवी यांनी राज्य सरकारने खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत मोठय़ा प्रमाणात वाढ केल्याचे सांगितले. पोलीस भरतीत शालेय, तसेच विविध संघटनांमार्फत सहभाग घेणाऱ्या उल्लेखनीय खेळाडूंनाच ५ टक्के आरक्षणाचा लाभ मिळत होता. यात आंतरविद्यापीठीय पातळीवर पदक मिळविणाऱ्या खेळाडूंचाही आता समावेश केला असून या निर्णयावर आपण कालच सही केल्याची माहिती त्यांनी दिली.
सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी स्पध्रेच्या आयोजनामागील उद्देश सांगितला. दरवर्षी या स्पध्रेत राज्यातील स्पर्धक मोठय़ा संख्येने सहभागी होत असून चांगला प्रतिसाद मिळत आहे. युवा नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसची वाटचाल जोरात सुरू असून युवकांच्या आशा-आकांक्षा त्यांच्या नेतृत्वात दिसत असल्याने देशातील युवक काँग्रेसकडे मोठय़ा प्रमाणावर आकर्षित होत आहेत, असे हत्तीअंबीरे यांनी सांगितले. स्पध्रेत शालेय विद्यार्थी, युवकांनी मोठय़ा प्रमाणावर सहभाग नोंदवला. अभिनेता आफताब शिवदासानी व अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी स्पर्धकांमध्ये चतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आफताब याने ‘ग्रँडमस्ती’तील गाण्यावर नृत्य सादर करून स्पध्रेपूर्वी वातावरण निर्मिती केली.
स्पध्रेच्या खुल्या गटात मुंबईच्या शोजी मॅथ्यू पहिला, तर मुंबईचाच पारसकुमार दुसरा, नाशिकचा कांतिलाल देवराम कुंभार तिसरा व कोल्हापूरचा धनाजी विष्णू कौलवकर याने चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धकांना विविध वयोगटांनुसार मोठय़ा प्रमाणात बक्षिसे देण्यात आली. १२ ते १५ वयोगटात मुलींमध्ये परभणीच्या अश्विनी काळे हिने बाजी मारली. स्वाती अंभुरे, गोकर्णा वैद्य यांनी दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. २० वषार्ंखालील मुलींच्या गटात नागपूरच्या ज्योती चव्हाणने बाजी मारली. १६ ते २० वयोगटातील मुलांमध्ये नाशिकचा सुरेश वाघ पहिला व सांगलीचा अमोल साळुंके दुसरा आला. प्रा.माधव शेजुळ, रणजित काकडे, शिवाजी वाघमारे, मंगल पांडे आदींनी आयोजनात सहभाग नोंदवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा