सीईटीपी प्रकल्पाला अद्यापही जोडणी न केलेल्या २० प्रोसेसवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश इचलकरंजीचे प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी गुरुवारी प्रोसेस उद्योजकांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामध्ये नदीचे प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांनी इचलकरंजी नगरपालिकेत शहरातील कापडावर प्रक्रिया करणाऱ्या प्रोसेसचालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस नगरपालिकेचे मुख्याधिकारी एम.देवेंद्रसिंग, वेस्टर्न महाराष्ट्र प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीराज मोहता, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बाळुशेट मर्दा, श्रीनिवास मर्दा यांच्यासह प्रोसेस चालक उपस्थितहोते.    
या वेळी गिरिराज मोहता म्हणाले, प्रोससच्या रासायनिक सांडपाण्यापासून होणारे पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सीईटीपी (संयुक्त औद्योगिक सांडपाणी प्रकल्प) प्रकल्पाची उभारणी केली आहे.
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ या प्रकल्पामध्ये प्रोसेसचे सुमारे ८ एमएलडी सांडपाणी जमा होत आहे. यावर योग्य ती सर्व प्रक्रिया केली जात आहे. सीईटीपीला जोडणी असलेल्या प्रोसेसमुळे नदीच्या सांडपाण्याचा मुद्दा संपुष्टात आला आहे.
अद्यापही सुमारे २० प्रोसेसनी सीईटीपीची जोडणी न केल्यामुळे त्यांच्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषणाची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावर प्रांत ठोंबरे यांनी अद्याप कोणत्या प्रोसेसनी सीईटीपीला जोडणी केलेली नाही,याची यादी मागून घेतली. अशा प्रोसेसवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्यानुसार प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

Story img Loader