कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात इलेक्ट्रानिक बसवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरोधात मंगळवार ८ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे. ठाण्यातील मुजोर रिक्षा चालकांना एन. के. पाटील यांचे प्रादेशिक परिवहन कार्यालय अभय देत असताना कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षा चालकांच्या मुसक्या आवळण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 
रिक्षेसाठी योग्यता प्रमाणपत्र घेण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती आरटीओकडून केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती असतानाही अनेक रिक्षा चालकांनी यासाठी टाळाटाळ सुरू केली आहे. त्यामुळे अशा रिक्षा चालकांना धडा शिकविण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. यासाठी १८ कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्या आली आहेत. डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगरसाठी दोन दोन पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके रिक्षा वाहनतळ, चौक, रस्त्यांवर उभे राहून रिक्षांना इलेक्ट्रॉनिक्स बसविले की नाही, याची शहानिशा करतील, असे डोळे यांनी स्पष्ट केले.

Story img Loader