तालुक्यात गोदावरी नदीपात्रातील असलेल्या पट्टय़ातून तहसीलदार राहुल जाधव यांनी वाळू तस्करीच्या विरोधात केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या सुमारे ४० केण्या (फरांडय़ा) पकडल्या असून त्यांची किंमत अंदाजे ३६ लाख रुपये आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी व धाडसी कारवाई असून त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. आमदार अशोक काळे यांचे शेतजमिनीतील सायफन फुटल्यामुळे अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागली.
सदरच्या सर्व केण्या तहसीलदार राहुल जाधव यांनी जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात आणून ठेवल्या आहेत. दरम्यान तहसीलदार जाधव व निवासी नायब तहसीलदार तुकाराम डावरे व महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू तस्करी करणाऱ्या २०० ते ३०० जणांच्या जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस बंदोबस्ताशिवाय झाल्याचे ते म्हणाले.
आज पहाटे तहसीलदार जाधव यांना गोदावरी नदी पात्रातून वाळूची तस्करी मोठय़ा प्रमाणावर सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी स्वत: तसेच नायब तहसीलदार डावरे यांच्यासह मंडलाधिकारी जाधव, वाणी, सांगळे, पवार, तलाठी सुनील साबणे, ठाकरे, खेरमारे, दिनकर, शेजूळ अन्य महसूल कर्मचारी यांनी चांदगव्हाण नदीपात्राकडे जाऊन धाडसी कारवाई केली. तेथे जमलेल्या २०० ते ३०० जणांच्या जमावाला त्यांनी लाठीमार करून पांगवले. तहसीलदार जाधव यांना बघून वाळू चोरटय़ांनी धूम ठोकली त्यामुळे त्यांना गोदापात्रातील केण्या (फरांडय़ा) जप्त करता आल्या. आमदार अशोक काळे यांची जमीन चांदगव्हाण, हिंगणी परिसरात आहे. तेथील जमिनीतील पाण्याचे सायफन वाळू तस्करीच्या वाहनांमुळे फुटले त्यामुळे त्यांनी महसूल अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची चर्चा आहे.
पोलिसांशिवाय केलेल्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे. नदीपात्रालगत ठिकठिकाणी मोठे वाळूंचे साठे आहेत. ते अंदाजे १०० ते १५० ब्रासचे आसपास असून तेही आम्ही जप्त करणार आहोत. दरम्यान वाळूतस्कर वन विभागाच्या जमिनीत वाळूचे अनधिकृत साठे करीत असल्याने त्यांना वन खात्यास नोटीस काढली आहे. जप्त केलेल्या केण्या कोणत्या वाळू तस्करांच्या आहेत हे समजू शकले नाही. महसूल प्रशासनाने वाळू तस्करांच्या सुमारे १२७ वाहनांवर कारवाई करून दि. १ एप्रिल २०१२ ते आज असेपर्यंत सुमारे ४६ लाख २९ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.