शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांनी    आता आपल्या भाडेकरूंविषयी कोणतीही माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात न कळविणाऱ्या घरमालकांविरोधातही मोर्चा वळविला आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांमध्ये २२ घर मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तसेच शहरातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचा एक भाग म्हणून आयुक्तांनी ही मोहीम उघडली आहे. समाजकंटक, दहशतवादी हे कुठेही लपून राहू शकतात. अशी समाज विघातक मंडळी ज्या अपार्टमेंट, बंगला किंवा चाळींमध्ये भाडेकरू म्हणून वास्तव्यास राहतात, त्या परिसरातील त्यांचा वावर कोणाला संशय येणार नाही असा असतो. परिसरातील रहिवाशांना त्यांच्याकडून कोणताही त्रास नसल्याने तेही अशा व्यक्तींविरुद्ध तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. परंतु घरमालकांनी भाडेकरू ठेवताना अशा सर्वच बाबींची दक्षता बाळगण्याची गरज आहे.
भाडेकरू ठेवताना त्याचे मूळ गाव, व्यवसाय, कुटुंबातील सदस्यांची संख्या, नातेवाईक, फोन नंबर, अशी सर्व माहिती घरमालकाने स्वत:कडे तसेच अपार्टमेंटच्या अध्यक्षांकडे आणि पोलिसांकडे देण्याची आवश्यकता आहे. पोलीस आयुक्तांकडून भाडेकरूची संपूर्ण माहिती ठाण्यात देण्याचे आवाहन यापूर्वी वारंवार करण्यात आलेले आहे. तरीही बहुतेक घरमालकांनी भाडेकरूंची माहिती कळविलेली नसल्याचे दिसून येत असल्याने अखेर पोलिसांनी अशा घरमालकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू केली आहे.
या कारवाईअंतर्गत मंगळवारी एकाच दिवसात गंगापूर, इंदिरानगर, अंबड, देवळाली कॅम्प अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल २२ घरमालकांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये इंदिरानगर ठाण्यात सर्वाधिक (१०) गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. देवळाली कॅम्प ठाण्यातही सहा गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गुन्हे नोंदविण्यात आलेल्यांमध्ये नाशिकमध्ये घर आहे, परंतु राहण्यास दुसऱ्या शहरात आहेत अशा घरमालकांची संख्या दहाच्या आसपास आहे. आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी घरमालकांना भाडेकरूंची माहिती त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader