अवैध दारू विक्री प्रकरणात मद्यविक्रेता चंद्रभूषण जयस्वाल याला अटक करण्यात हयगय केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी नागभीडचे उपनिरीक्षक सोमनाथ वाघ यांची तडकाफडकी बदली केली, तर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.   गुन्हेगार व अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस अधीक्षक राजीव जैन यांनी रणशिंग फुंकले आहे.  त्यामुळे जिल्ह्य़ातील अवैध दारूविक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.  जिल्ह्य़ातील अवैध दारूविक्री  पूर्णपणे बंद करा, असे निर्देश  पोलिस अधीक्षकांनी  पोलीस अधिकारी, तसेच दारूविक्रेत्यांना दिले आहेत. त्याउपरही दारूविक्री सुरू असेल तर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेशही दिले आहेत.
असे असताना पोलीस अधिक्षकांच्या या निर्देशांना  नागभीड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ वाघ यांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे वाघ यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. जयस्वाल यांना अटक करण्यात हयगय करणारे सुरेश बांबोडे, प्रकाश नैताम व गोविंद आडे या तीन पोलीस कॉस्टेबल्सना निलंबित केल्यानेएकच  खळबळ उडाली आहे.

Story img Loader