खाजगी रुग्णालयात निर्माण होणारा जैव-वैद्यकीय कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणाऱ्या शहरातील केअर हॉस्पिटल, धंतोलीतील अवंती, होप आणि सीआयआयएचओ या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली. रुग्णालयाचा नोंदणी परवाना का रद्द करण्यात येऊ नये अशी विचारणा करतानाच चारही रुग्णालयांना आरोग्य विभागाने दंड ठोठावला आहे. गेल्या दोन दिवसात शहरातील सहा रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली असून खासगी रुग्णालय मात्र त्याबाबत जागृत नसल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालयातून निर्माण होणारा घातक जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने भांडेवाडीमध्ये व्यवस्था केली असून प्रत्येक रुग्णालयाने त्या ठिकाणी जाऊन कचरा टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर अनेक रुग्णालये नियमांचे उल्लंघन करीत महापालिकेच्या कचरा पेटीत नेऊन टाकत असल्याने शहरात मोठी समस्या निर्माण झाली आहे. अखेर आरोग्य विभागाने या कृतीविरोधात धडक मोहीम हाती घेतली असून आज शहरातील चार खाजगी रुग्णालयांवर कारवाई करून त्यांनी नोटीस बजावण्यात आली. बुधवारी धंतोलीतील स्पंदन रुग्णालयावर कारवाई करून २५ हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता. गुरुवारी होप, अवंती, केअर आणि सीआयआयएचओ या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली.
केअर रुग्णालयाला ४० हजार, होप रुग्णालयाला ३५ हजार, अवंती रुग्णालयाला १० आणि सीआयआयएचओला १५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. सोबतच आरोग्य विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती कळवून या रुग्णालयाविरुद्ध कारवाई करण्याची शिफारस केली. जैव-वैद्यकीय कचरा नियमित कचऱ्यात समावेश न करता, हा कचरा वेगळा ठेवून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी तंबी देण्यासोबतच या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचा इशारा नोटीसीद्वारे आरोग्य विभागाने दिला.
शुक्रवारी सकाळी मेहाडिया चौकातील ग्रीन सीटी हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर आणि रविनगर चौकातील सेनगुप्ता हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरला कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाचा दंड केला. ग्रीन सिटी हॉस्पिटलवर यापूर्वी कारवाई करण्यात आली होती मात्र त्यानंतर हॉस्पिटलने जैव वैद्यकीय कचरा महापालिकेच्या कचरा पेटीत टाकून नियमांचे उल्लंघन केले. महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, आरोग्य निरीक्षक राठोड आणि प्रदूषण मंडळाचे भिवापूरकर यांनी कारवाई केली.