जिल्हा काँग्रेस पक्षातील गटबाजी आणि बेशिस्तपणामुळे जिल्ह्य़ात काँग्रेस पार रसातळाला गेलेली असताना निरीक्षकांकडून कोणावरही कारवाई होत नसल्याने तसेच निरीक्षकांना मारहाण करणाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये दशकापासून मोठय़ा प्रमाणात गटबाजी उफाळली आहे. केंद्रासह राज्यातही सत्तास्थानी असलेल्या काँग्रेसची संपूर्ण जिल्ह्य़ात वाताहत झाली आहे. प्रदेश निरीक्षकासह महानगर अध्यक्षांच्या श्रीमुखात थप्पड मारण्याचे प्रकार येथे महापालिका निवडणुकीप्रसंगी भरसभेतच झालेले असताना दोषींवर कारवाई होत नसल्याने जिल्ह्य़ात काँग्रेस जनातच चिंतेचे वातावरण आहे. महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाने भोपळाही फोडला नाही.
७५ उमेदवार असणाऱ्या महापालिकेसाठी जळगाव काँग्रेसला फक्त ४७ उमेदवार मिळाले. त्यातही ४६ उमेदवारांना अनामतसुद्धा वाचविता आली नाही. जिल्हा काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांच्या हत्येनंतर जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजीत मोठी वाढ झाली. प्रा. पाटील यांना मानणाऱ्या गटाने आपल्या नेत्यांच्या हत्येसाठी पक्षाच्या माजी खासदारासह एक माजी आमदार व माजी जिल्हा अध्यक्षांनाच जाहीरपणे जबाबदार धरले. तेव्हापासून त्या गटाने आपले अस्तित्व स्वतंत्र ठेवले असून विद्यमान अध्यक्षांशी जुळवून घेण्यास त्यांची तयारी नाही.
महापालिका निवडणुकांपूर्वी काँग्रेस भवनात उमेदवार ठरविण्याच्या सभेत महानगर अध्यक्ष सलीम पटेल यांना एका इच्छुक महिला उमेदवाराने श्रीमुखात भडकावली. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचार सभेत पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा सरचिटणीस रामहरी रुपनवार यांच्यावरच विवेक ठाकरे या उमेदवाराने हल्ला केला. महानगर अध्यक्ष व प्रदेश निरीक्षकावर हल्ल्याच्या या प्रकारांमुळे जिल्हा काँग्रेस पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आली.
या गंभीर प्रकारांची वाच्यता प्रदेश स्तरावर गेली आणि ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटनांच्या चौकशीसाठी प्रदेश सरचिटणीस आ. संजय दत्त जळगावला सप्टेंबरमध्ये येऊन गेले. आपला चौकशी अहवाल एक महिन्यात ते प्रदेश काँग्रेसकडे सादर करणार होते. घटना घडून दोन महिने झाले. निरीक्षक संजय दत्त यांनी दौरा करूनही लवकरच दोन महिने होतील. पण प्रदेश काँग्रेसकडे तो अहवाल गेला की नाही याबद्दल शंकाच आहे, कारण संबंधितांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. बेशिस्ती व गटबाजीच्या गर्तेत पार वाट लागलेल्या जिल्हा काँग्रेस पक्षातील एक गट दर सहा महिन्यांनी अध्यक्ष बदलण्याचा एक कलमी कार्यक्रम सातत्याने राबवून आपले अस्तित्व दाखवित असतो. अशा लोकांवर प्रदेश काँग्रेसकडून कोणतीच कारवाई होत नसल्याने बेशिस्त करणाऱ्यांचे धाडस वाढल्याचे येथे चित्र आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा