निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेवर सादर न केल्याबद्दल तीन नगरसेवकांना जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी अपात्र ठरवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या तीन नगरसेवकांसह अन्य पराभूत पाच उमेदवारांनाही तीन वर्षे निवडणूक लढवता येणार नाही.
सत्ताधारी काँग्रेसच्या रत्नमाला जगन्नाथ लहामगे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अॅड. श्रीराम गणपुले व शोभा परदेशी यांचा अपात्र नगरसेवकांमध्ये समावेश आहे. निवडणुकीत पराभूत झालेले शौकत जहागीरदार, जुलेखा बेग, शांताराम पवार, सचिन साळुंखे व यशोदा जेधे यांनाही याच कारणावरून तीन वर्षांसाठी निवडणुकीला अपात्र ठरवण्यात आले आहे.
डिसेंबर २०१२ मध्ये संगमनेर नगरपालिकेची निवडणूक झाली. नियमानुसार त्यानंतर तीन महिन्यांत उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब जिल्हाधिका-यांना सादर करणे गरजेचे होते. मात्र संगमनेरचे तीन नगरसेवक व पराभूत पाच उमेदवार अशा आठजणांनी वेळेत हा हिशोब सादर केला नाही. याबाबत त्यांना नोटिसा बजावून म्हणणे मांडण्यास कळवण्यात आले होते. तीन नगरसेवक व पराभूतांपैकी साळुंके अशा चौघांनी म्हणणे मांडले होते. उर्वरित चौघांनी मात्र ते टाळले. जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी या आठही जणांवर वरीलप्रमाणे कारवाई केली.
नगरसेवकांना दिलासा
अपात्र ठरवलेल्या तीन नगरसेवकांनी जिल्हाधिका-यांच्या निर्णयाला सोमवारी विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे अपील दाखल केले होते. ते दाखल करून घेताना आयुक्तांनी आज नगरसेवकांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या तीन नगरसेवकांवरील अपात्रतेचे गंडांतर काही दिवस तरी लांबले आहे.     

Story img Loader