अंबाजोगाईजवळ खासगी स्कूल बस उलटून १६ विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेनंतर मोठय़ा संख्येने धावणाऱ्या स्कूल बसची तपासणी करण्याची मोहीम राबवताना परिवहन विभागाने ३४ बसेसवर कारवाई करून जवळपास १६ हजार ७०० रुपये दंड वसूल केला. स्कूल बससाठी परिवहन, पोलीस व शिक्षण विभागांची जिल्हास्तरावर समिती तयार करण्यात आली आहे. जिल्हय़ात जवळपास ४०० स्कूल बस विद्यार्थ्यांची ने-आण करतात.
अंबाजोगाईजवळ स्कूल बस उलटून १६ विद्यार्थी जखमी झाले. अपघातानंतर यंत्रणेने गुन्हा दाखल केला. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीने हा मुद्दा उचलून धरला. नियमानुसार दर सहा महिन्यांत एकदा बैठक घेणे बंधनकारक असताना दोन वर्षांत एकच बैठक जिल्हा समितीने घेतली.
शालेय पातळीवर समित्यांच्या बैठका तीन महिन्यांतून एकदा घेणे गरजेचे होते, परंतु शालेय समित्याच स्थापन नाहीत. बसेससाठी वाहनतळ, वाहन थांबे निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक बसमध्ये मुलांची यादी, नाव, वर्ग, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, प्रत्येकाच्या नावासमोर रक्तगट, थांबण्याचे ठिकाण, मूळ ठिकाण, समाप्तीचे ठिकाण आदी माहितीसह प्रथमोपचार पेटी, बसच्या सीटखाली बॅग ठेवण्यासाठी रॅक व ५ वर्षांचा अनुभव असलेला चालक आदी बाबी आवश्यक आहेत.
मूळात स्कूल बसच बेकायदा असल्याने या तरतुदींचे पालन करण्याचा विचारच केला जात नाही. परिवहन विभागाने सर्वच मोटार बसधारकांना कायद्यांतर्गत नोटिसा बजावल्या आहेत.

Story img Loader