शिक्षण उपसंचालकांकडून विज्युक्टाच्या मागण्या निकालात
२०१३-१४ च्या सत्रात विज्ञान शाखेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिलेल्या कनिष्ठ महाविद्यायांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक महेश करजगावकर यांनी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (विज्युक्टा) पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या सभेत सांगितले. या सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षण उपसंचालकांनी सकारात्मक निर्णय घेतले.
कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिले जात असल्याने कला व वाणिज्य शाखांच्या विद्यार्थी प्रवेशावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे अशा कनिष्ठ महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे शिक्षण उपसंचालकांनी मान्य केले. २०१३-१४ मध्ये अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय नवीन पदांना मंजुरी दिली जाणार नाही तसेच ज्या शाखेत अतिरिक्त शिक्षक नाहीत, अशा शाखेत पद भरतीसाठी मंजुरी दिली जाणार आहे. नागपूर विभागात विना अनुदान व कायम विना अनुदान तत्त्वावर सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात पात्रताधारक शिक्षकांची नियुक्ती केलेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, अशी महाविद्यालये बंद करण्यात येतील, यासह विविध समस्या तातडीने सोडविण्याचे त्यांनी मान्य केले.
विज्युक्टाचे महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकासोबत शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
यावेळी विज्युक्टाचे उपाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत भोंगडे, प्रा. सुभाष अंधारे, प्रा. लक्ष्मीकांत धानोरे, प्रा. बबन राऊत, प्रा. ज्ञानेश्वर डोंगरे, प्रा. आल्हाद चिमोटे, प्रा. अभिजीत पोटले, प्रा. मधुकर गुंडलवार, शास्त्र सल्लागार उमरेडकर, सहायक शिक्षण निरीक्षक रत्नाकर मेंढुले, गजानन वानखेडे आदी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा