शाळेविषयीची सर्व माहिती भरून न देणाऱ्या १८ शाळांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांची माहिती संगणकीकृत करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यात माहिती न देणाऱ्या १८ शाळांवर कारवाई केली जाणार आहे. इमारत, क्रीडांगण, विद्यार्थिसंख्या, शिक्षकांची सविस्तर माहिती अशी कागदपत्रे ऑनलाइन भरण्याची प्रणाली विकसित करण्यात आली होती. ७९० शाळा आणि महाविद्यालयांनी ही माहिती भरून घेणे अपेक्षित होते. शहरातील १८ शाळांनी माहिती भरली नाही. अल्फा आयडियल प्राथमिक शाळा, दुर्गामाता इंग्रजी प्राथमिक शाळा, स्वानंद इंग्रजी प्राथमिक शाळा, न्यू उर्दू प्राथमिक शाळा, नॅशनल मराठी प्राथमिक शाळा, नेताजी सुभाषचंद्र इंग्रजी प्राथमिक शाळा, गिराई प्राथमिक विद्यालय, अजिंठा व्हॅली पब्लिक स्कूल, गिरीश ज्ञानसंस्कार विद्यालय, जिजामाता इंग्रजी प्राथमिक शाळा, मोमीन उर्दू प्राथमिक शाळा, गुजराती इंग्रजी प्राथमिक शाळा, इं. भा. पाठक महिला कनिष्ठ महाविद्यालय, मिलिंद कला कनिष्ठ महाविद्यालय, विवेकानंद कला व सरदार दुलीपसिंह महाविद्यालय, शासकीय ज्ञान-विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, एस.एन.डी.टी. कनिष्ठ महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांनी माहिती सादर केलेली नाही. बुधवार (१९ डिसेंबपर्यंत) माहिती न आल्यास या शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविले जाईल, असे कळविण्यात आले आहे.