कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्ते, गल्लीबोळांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृत हॉटेल, व्यापारी गाळे उभारले गेले आहेत. या अनधिकृत बांधकामांबाबत सविस्तर अहवाल येत्या दीड महिन्यात सर्वसाधारण सभेत मांडला जावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी नुकतीच केली. या अहवालाच्या आधारे ही बांधकामे जमीनदोस्त करण्यात यावीत, असे आदेश महापौर कल्याणी पाटील यांनी प्रशासनाला दिले.
कल्याणमधील लालचौकी ते पत्रीपूलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा जुनी दुकाने, गाळे तोडून तेथे दोन मजल्यांच्या इमारती, व्यापारी संकुले उभारण्यात आली आहेत. क प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांच्या आधिपत्याखाली हा भाग येतो. त्यांनी गेल्या दोन वर्षांत या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी सर्वसाधारण सभेत सभा तहकुबी सूचना मांडली होती. क प्रभागात बजाजभवन, श्रीराम फास्टफूट, कॉबलर दुकान, गोपाळकृष्ण हॉटेल, बाजारपेठमधील संकुल, रामदेव, गुरुदेव हॉटेलच्या शेड अशी अनेक अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. तक्रारी करूनही बोराडे त्याची दखल घेत नाहीत, असा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला.
वालधुनी येथील भूखंडावर १५ गाळे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती काही नगरसेवकांनी यावेळी दिली. या अनधिकृत बांधकामांची चौकशी करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी समिती नेमण्यात आली आहे. या समितीला प्रशासनाकडून केराची टोपली दाखविण्यात येत आहे. या समितीने अनधिकृत बांधकामांची चौकशी करून तो अहवाल सर्वसाधारण सभेपुढे ठेवावा. या अहवालानुसार येत्या दीड महिन्यात सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येईल असे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.

Story img Loader