गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला फुलबाजार स्थलांतराच्या वादावर अद्याप ठोस तोडगा निघू शकलेला नाही. फुल विक्रेत्यांनी सराफ बाजाराची ‘लक्ष्मणरेषा’ ओलांडण्यास नकार दिला असताना सोमवारी या परिसरात अतिक्रमण मोहीम राबवून सुमारे १०० फुलविक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. परंतु, फुल विक्रेत्यांनी स्थलांतरीत होणार नसल्याची ठाम भूमिका घेत पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शविला आहे.
जून महिन्यातील दमदार पावसाने सरकारवाडा परिसरातील दुकांनामध्ये पाणी शिरले. टपरीधारक, फुलविक्रेते, भाजीबाजार विक्रेते यांच्या बेजबाबदारपणामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा निष्कर्ष सराफ बाजारातील व्यवसायिकांनी काढला. त्यानंतर या परिसराची आ. वसंत गीते, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, नगरसेविका सुरेखा भोसले यांनी पाहणी करून सरकारवाडा परिसरात भरणारा फुलबाजार हा गणेशवाडी येथील व्यापारी संकुलाच्या वाहनतळ परिसरात थाटण्याची सूचना केली. त्यानुसार गत शुक्रवारी हा फुलबाजार स्थलांतरीत करण्याच्या दिशेने हालचाली झाल्या. परंतु, फुल विक्रेत्यांनी सराफ बाजार तसेच सरकारवाडा परिसराची सीमारेषा ओलांडण्यास नकार दिला. आम्हाला ठराविक जागा द्या, या क्षेत्राच्या पुढे गेल्यास अतिक्रमण राहील, अशी सूचना द्या अशी भूमिका घेतली. एकीकडे, संकुलातील वाहनतळ परिसरात ४१ विक्रेत्यांना परवाने देण्यात आल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ही मंडळी नेमकी कोण, असा प्रश्न फुल विक्रेत्यांनी उपस्थित केला. मुळात पहाटेपासून सकाळी ९.३० पर्यंत भरणाऱ्या फुल बाजारात ३००-४०० व्यवसायिक काम करतात. या सर्वाना वाहनतळाची जागा अपुरी पडणार आहे. यामुळे आम्हाला कायमस्वरूपी जागा द्यावी, असे काहींचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सरकारवाडा पोलिसांच्या मदतीने या परिसरात अतिक्रमण मोहिम राबविली. त्यात १०० हुन अधिक फुल विक्रेत्यांचे सामान जप्त करण्यात आले. या घटनेनंतर विक्रेत्यांच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात कुठल्याही परिस्थितीत विक्रेते स्थलांतर करणार नसल्याची ठाम भूमिका घेण्यात आली आहे.
दरम्यान, फुल विक्रेते आणि महापालिका यांच्या वादात नाशिक जिल्हा हॉकर्स टपरीधारक युनियनने उडी घेतली आहे. रविवार कारंजा, बोहरपट्टी, मेनरोड, शिवाजीरोड, महालक्ष्मी चित्रपटगृह परिसर, नाशिकरोड येथे राबविण्यात येणारी अतिक्रमण मोहीम थांबवावी, फुल बाजाराचे स्थलांतर रद्द करावे, दरवाढ रद्द करावी, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. फुलबाजारातील अतिक्रमणाबाबत महापौर काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.