झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविल्यानंतरची असह्य़ तगमग
तळपते उन्हं.. डोक्यावर असलेले छप्पर अतिक्रमण हटाव विभागाने हिरावून घेतले, त्यामुळे राहायला जागा नाही.. मुलाबाळांना भूका लागल्या आहेत पण, अन्न शिजवायला पुरेसे धान्य नाही.. कुठे आसरा घ्यावा तर महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहिमेचे कर्मचारी बसू देत नाही अशा अवस्थेत विजयनगरातील शेकडो कुटुंबे ‘आम्हाला जागा द्या हो’, अशी विनवणी करीत फिरत आहेत.
गेल्यावर्षी राजनगर परिसरातील अग्निशामक विभागाच्या जागेवर कुटुंबीयांनी बस्तान मांडले असताना ते अतिक्रमण विभागाने उद्ध्वस्त केले होते त्यानंतर त्यातील अनेक लोकांनी विजय नगरातील राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या व्हीएनआयटी समोरील जागेवर अतिक्रमण करून त्या जागेचा ताबा घेऊन झोपडय़ा उभारल्या. काही राजकीय नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या वरदहस्तामुळे अनेकांनी पक्के घरे बांधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यांना महापालिकेतर्फे अनेकदा नोटीस देऊन त्याची काहीच दखल घेतली नसल्यामुळे जवळपास १२५ च्या जवळपास मोलमजुरी करणाऱ्या या अतिक्रामकांचे संसार रविवारी सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने अवघ्या एका तासात उद्ध्वस्त केले. आज त्यातील अनेक कुटुंबांनी ४५ अंश सेल्सियस तापमानात रस्त्याच्या कडेला संसार थाटले. सर्व झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्यात यावे, आम्हाला जागा द्यावी अशी मागणी करीत सकाळी शेकडो विस्थापित झालेल्या महिला, लहान मुले आणि नागरिकांनी निदर्शने केली. त्यांच्या निदर्शनाची मात्र कुठल्याच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दखल घेतली नाही. काही सामाजिक आणि राजकीय संघटनांचे कार्यकर्ते केवळ फोटो काढण्यापुरते त्यांच्यामध्ये सहभागी झाले. त्यांच्याविषयी आस्था व्यक्त करीत सरकारने त्यांचे पुनर्वसन करावे आणि त्यानंतर हटवावे अशी मागणी केली. ओरडून ओरडून किती ओरडणार म्हणून काही झोपडपट्टीतील ही सर्व मंडळी काही वेळाने चूप बसली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. पाठिशी असणारे सामाजिक कार्यकर्ते त्यानंतर मात्र परिसरात कुठेच दिसून आले नाही.
गेल्या दोन वर्षांपासून विजयनगर परिसरातील सव्वाशे कुटुंबांचा संसार अतिक्रमण हटाव विभागाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये उद्ध्वस्त केल्यानंतर आज अनेकांच्या घराचे केवळ अवशेष त्या ठिकाणी शिल्लक होते. झोपडपट्टीतील अनेक महिला व पुरूष तोडलेल्या झोपडय़ाचे अवशेष जमा करण्याचा प्रयत्न करीत होते मात्र त्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्यामुळे त्यांना त्या परिसरात फटकू देत नव्हते. त्यातही काही कुटुंबांनी ‘आमचे सामान घेऊ द्या’ अशी विनंती केल्यावर त्याला परवानगी देण्यात आली. त्यानंतर अनेके कुटुंबांनी गाडकी-मडकी गोळा केली. या झोपडपट्टीत राहणारा वर्ग हा मोलमजुरी करणारा आहे. त्यातील कुटुंबे काही पक्के घरे बांधण्याच्या तयारीत होती. झोपडपट्टी हटविण्यापूर्वी त्यांना चार वेळा महापालिकेतर्फे नोटीस देण्यात आली होती मात्र, त्या नोटिशीला त्यांनी केराची टोपली दाखविली. अतिक्रमण कारवाईनंतर झोपडपट्टीतील लोकांमध्ये प्रचंड चीड होती. त्यामुळे प्रत्येकजण आपला रोष व्यक्त करीत होते मात्र त्या रोष ऐकूण घेण्यासाठी समोर आले नाही. निवडणूक आली की या लोकांना घेऊन राजकारण करणारे नेतेही हतबल असल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on illegal slums anybody give them place to stay