दोन वर्षांपूर्वी गडचिरोली शहरातील चारही प्रमुख मार्गावरील नगरपालिकेने हटविलेले अतिक्रमण पूर्ववत कायम झाल्यामुळे आता पुन्हा अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहीम सुरू केली आहे.
प्रचंड पोलीस ताफा व बुलडोजरच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहिमेला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून ही मोहीम तीन दिवसपर्यंत चालणार आहे. मात्र, या मोहिमेमुळे फुटपाथ दुकानदारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.
गडचिरोली शहतील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मुल या चारही प्रमुख मार्गावर फुटपाथ दुकानदार व अन्य व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झालेला आहे. त्यातच मागील वर्षी याचारही मार्गावर नगरपालिकेने रस्ता दुभाजकांचे बांधकाम केल्याने रस्ते आणखी अरुंद झालेले आहेत. दोन वर्षांपूर्वी या रस्त्यावरील अतिक्रमण हटवले होते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा पक्क्या नाला व फुटपाथचे बांधकाम न केल्याने काही महिन्यातच दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण करुन दुकाने थाटली.
आता मात्र पालिका बांधकाम विभाग व महसूल विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पालिका प्रशासनाने फुटपाथ दुकानदार व अन्य अतिक्रमणधारकांना सूचना देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितले होते. प्रशासनातर्फे चारही प्रमुख मार्गावर सीमांकन करण्यात आले. ज्यांनी अतिक्रमण काढले नाहीत अशा व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यासाठी बुलडोझरचा वापर केला जात आहे. पहिला दिवशी धानोरा मार्गावरील बसस्थानकापासून मोहीम सुरू करून इंदिरा गांधी चौक व आरमोरी मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.
आज चंद्रपूर व चार्मोशी मार्गावर मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढले जात असताना केवळ फुटपाथवरील अतिक्रमण काढू नये तर पक्के बांधकाम असेलेले अतिक्रमणही काढण्यात यावे, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. अतिक्रमण काढण्यासाठी आजही पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. गडचिरोलीच्या तहसीलदार वंदना सवरंगपते, नगरापालिकेचे मुख्याधिकारी आस्तिककुमार पांडे, नायब तहसीलदार पित्तुलवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी पालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा