आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह १५ कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायी कारवाईच्या विरोधात सर्वसामान्य जनता, शिवसेना-भाजपा यांच्यासह हिंदुत्वादी संघटनांनी शनिवारी पोलीस प्रशासनाला सुबुध्दी सुचावी व न्यायालयीन लढाई लढण्याकरिता आमदार क्षीरसागर व त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे, असे साकडे बिनखांबी गणेश मंदिर येथील गणरायाला घालून महाआरती करण्यात आली.    
विनयभंगाचे गुन्हे आमदार क्षीरसागर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर नसून कोणा एका अज्ञातावर दाखल करण्यात आले आहेत, अशी ग्वाही देऊन प्रत्यक्षात न्यायालयात हजर केल्यानंतर विनयभंगासह सर्वच गुन्हे पोलिसांनी कायम ठेवल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. चुकीच्या कारवाया करून आमदारांसह सर्वाचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न हाणून पाडले जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, किशोर घाडगे, विश्व हिंदू परिषदेचे सुहास जोशी, श्रीकांत पोतनीस, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, शिवप्रतिष्ठानचे बिपीन खेडेकर, ऋतुराज क्षीरसागर, वैशाली क्षीरसागर, महिला आघाडीच्या पूजा भोर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.