गुलाबाच्या लाल व पिवळ्या फुलांना ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे चांगली मागणी आहे. फुलांची मागणी वाढल्याने आज त्याचे दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. आज वीस नगाच्या डच गुलाबाचा दर साठ रुपयांपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत तर गुलाब गड्डीचा (बारा नग) दर सहा ते दहा रुपये इतका होता. डच गुलाबाला सर्वाधिक मागणी असून लाल गुलाबाला साठ रुपयांपासून एकशे तीस रुपये तर पिवळ्या गुलाबाला पन्नास रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत दर होता. साधी गुलाब गड्डी (१० ते १२ फुले)चा दर ८ ते १५ रुपये इतका होता. बोडरे, ट्रॉजिकल, प्रेसिडेंट, गोल्डन स्ट्राईक अशा वेगवेगळ्या जातींच्या गुलाबांची बाजारात आवक झाली. शहरातील विविध फुल बाजारात आज डच गुलाबांची तळेगाव येथून सर्वाधिक आवक झाली असून याशिवाय मंचर, पिरंगुट, शिरवळ, माण, हिंजवडी, तळेगाव, मावळ, पेढ येथूनही गुलाबाची आवक झाली. डच गुलाबांच्या (२० नग) आठ हजार आठशे साठ गड्डींची आवक बाजारात झाली तर गुलाब गेलिंटरची चार हजार गड्डींची, साध्या गुलाबाची पाचशे तीस गड्डींची आवक झाली. ‘दोन-तीन आठवडय़ांपासून गुलाबांना चांगला भाव होता. पण, आता व्हॅलेंटाईनमुळे फुले बाजारातील दर दहा ते वीस रुपयांनी वाढले आहेत. मागील वर्षी डच गुलाबाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत गेला होता’, असे फुलांचे व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले. गुलाबाला मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी दहा ते वीस टक्के अधिक दर मिळाला आहे. चाळीस ते पन्नास सेंटीमीटरच्या फुलांनाही चांगली मागणी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा