राज्यात नदीकाठाला पूररेषेची नव्याने निश्चिती करण्यात येत असून या पूरपट्टय़ात नव्याने बांधकामे झाली तर, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला जबाबदार धरुन कारवाई करण्यात येईल, असे पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगली येथे पत्रकार बठकीत सांगितले. सांगली महापालिकेच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोर जामदार यांची निवड करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली.
महापालिका क्षेत्रात नदीकाठाला नागरी वस्ती वाढत आहे. अतिवृष्टीमुळे नदीला पूर आल्यानंतर या नागरीवस्तीची वाताहत होते. हानी टाळण्यासाठी प्रशासनाला जोरदार प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे पूर पट्टय़ातील हानी टाळण्यासाठी शासनाने कठोर निर्णय घेतला आहे. पाटबंधारे विभाग नव्याने पूररेषा निश्चित करीत असून या ठिकाणी कोणतीही योजना हाती घ्यायची झाली तर, संबंधित महापालिकेला पाटबंधारे व पुनर्वसन खात्याची पूर्व परवानगी आवश्यक ठरणार आहे. परवानगीविना बांधकाम केले अथवा तत्सम काम केले तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य शासनाने पूरपट्टय़ाच्या निश्चितीसाठी व अन्य कामासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
डॉ. कदम यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्यातील जत,आटपाडी तालुक्यात अद्याप टंचाईग्रस्त स्थिती आहे. त्यामुळे या भागात दुष्काळी उपाययोजना आणि चारा छावण्या १५ ऑगस्टपर्यंत सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानंतर स्वतंत्र समितीमार्फत आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे सांगितले. सुखवाडी (ता. पलूस) या ठिकाणी कृष्णा नदीवर पूल बांधण्याला मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिकेत काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोर जामदार यांची निवड झाली असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. जामदार यांची निवड माजी मंत्री मदन पाटील यांच्याशी चर्चा करून केली आहे. महापालिकेला २० कोटींचा स्वतंत्र निधी मुख्यमंत्र्यांच्या फंडातून उपलब्ध होणार आहे. नवनिर्वाचित सदस्यांना विश्वासात घेऊन या निधीचा विनियोग विकास कामांसाठी केला जाईल असेही ते म्हणाले.
महापालिका आयुक्त संजय देगावकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,त्यांना आतापर्यंत संधी देण्यात आली. त्यांनी भरपूर सेवा केली. त्यामुळे त्यांची योग्य ठिकाणी वर्णी लावण्यात येईल, असे उपरोधिकपणे डॉ. कदम यांनी सांगितले.
यात्रेकरूंना लाखाची मदत
गुरुपौर्णिमेनिमित्त गाणगापूरला जाऊन परतत असताना अपघातात मरण पावलेल्या १८ यात्रेकरूंना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत डॉ. कदम यांनी या वेळी जाहीर केली. २२ जुल २०१३ रोजी कर्नाटकातील िशदगी येथे झालेल्या अपघातात १८ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. हे यात्रेकरू जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा