गडचिरोली जिल्ह्य़ातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, तसेच जिल्ह्य़ात बदली होऊन रुजू होण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व अद्याप रुजू न झालेल्या अधिकाऱ्यांवर शासनस्तरावरून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशा सूचना अप्पर मुख्य सचिव (गृह) अमिताभ राजन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गडचिरोली जिल्ह्य़ातील रिक्त पदांसोबतच विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त बी.व्ही. गोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, अतिरिक्त आदिवासी विकास आयुक्त पल्लवी दराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूपेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी उदय चौधरी, अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी नीलेश गटणे, संजय धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, प्रवीण साळुंखे उपस्थित होते.
शासनाने गडचिरोली जिल्ह्य़ाच्या विकासाकरिता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने १५ डिसेंबरला राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्यासह अप्पर मुख्य सचिव व विविध विभागातील सचिवांनी जिल्ह्य़ातील विविध तालुक्यांचा दौरा करून विकास कामांचा आढावा घेतला होता.
त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मुख्य सचिव बांठिया यांनी विशेष आढावा बैठक घेऊन विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बैठकीनंतर मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्य़ातील विकास कामांची वस्तुस्थिती सादर केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सतत आढावा घेऊन विकास कामे त्वरित पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या, अशी माहिती अमिताभ राजन यांनी या बैठकीत दिली.
बैठकीत रिक्त पदांच्या आढाव्यासोबतच विविध विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी राजन यांनी जिल्ह्य़ातील रिक्त पदे त्वरित भरण्याच्या सूचना केल्या, तसेच वारंवार सूचना देऊनही बदलीच्या ठिकाणी रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन स्तरावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा