महिला, मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांमुळे खडबडून जागे झालेल्या ठाणे पोलिसांनी अशा रोड रोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी उशीरा का होईना कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, कळवा-मुंब्रा आदी शहरांमधील शाळा-महाविद्यालयांच्या आवारात महिला पोलिसांची गस्त वाढविण्याचे आदेश पोलीस आयुक्त के.पी.रघुवंशी यांनी दिले आहेत.
दोन महिन्यांपूर्वी बदलापूरच्या आदर्श महाविद्यालयात मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी असाच प्रकार डोंबिवलीत घडला. तरुणीची छेड काढणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या टोळक्यांना हटकणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला या घटनेत आपला जीव गमवावा लागला. महिला, मुलींच्या छेडछाडीच्या या वाढत्या घटनांची दखल पोलीस आयुक्त रघुवंशी यांनी घेतली असून पोलीस मुख्यालयात यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक खास बैठक घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत ‘रोड रोमिओच्या मुसक्या आवळण्यासाठी खास पथके तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच महिला, महाविद्यालयीन तरुणींचा जास्त वावर असणाऱ्या भागातही महिला पोलिसांचा जागता पहारा ठेवता येईल का, याची चाचपणीही पोलिसांनी सुरू केली आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात महिला पोलिसांच्या पथकामार्फत लक्ष ठेवण्याच्या सूचनाही रघुवंशी यांनी दिल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामध्ये वाणिज्य शाखेत शिकणारा राजाराम मेहेर याच्यासह चार विद्यार्थ्यांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही अल्पवयीन मुलांना अटक केली. अल्पवयीन मुलीची छेड काढण्यावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हाणारीत झाल्याचे पुढे स्पष्ट झाले. ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पूर्व भागातील नवनीतनगरमध्ये राहणाऱ्या संतोष विच्छीवोरा या तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनांची दखल घेत रघुवंशी यांनी आयुक्तालय हद्दीतील सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रस्त्यावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच रोड रोमिओंना वचक बसावा यासाठी गस्त वाढविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, या शहरातील शाळा तसेच महाविद्यालय परिसरातही ‘रोड रोमिओं’चा वावर मोठय़ा प्रमाणात वाढला असून तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही वाढल्याच्या तक्रारी आहेत. या पाश्र्वभूमीवर शाळा, महाविद्यालय परिसरात गस्त घालण्यासाठी महिला पोलिसांचे पथक नेमण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या संदर्भात ठाणे सह पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
’ समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज
डोंबिवलीत १७ नोव्हेंबर रोजी आनंदनगर क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून सचिन तिवारी या १५वर्षांच्या तरुणाचा चार मुलांनी बेदम मारहाण करून खून केला होता. कल्याण-डोंबिवली परिसरात महिला, मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढीस लागले आहेत. तशा तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. या घटनांची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात येत नाही. लहान मुले म्हणून त्यांना समज देऊन सोडण्यात येते. मात्र या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आता अधोरेखित होऊ लागली आहे.
’ समुपदेशन महत्त्वाचे
‘कुमारवयात अशी हिंस्रता मुलांमध्ये येत असली तरी घरातूनच त्यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे. घरातून अशा मुलांना योग्य मार्गदर्शन होत असते तर अशी वेळ आली नसती. वाढत्या वयाबरोबर भावनिक, लैगिंक बदल होत असतात. आताच्या वेगवान धबडग्यात मुले काय करतात याची अनेक पालकांना काळजीच नसते. त्यामधून असे प्रकार होत असतात. अशा घटना टाळण्यासाठी लैंगिक शिक्षणविषयक मार्गदर्शन प्रभावीपणे केले जाणे आवश्यक आहे. यापूर्वी अशा घटना घडत पण त्याचे स्वरूप एवढे आक्रमक नव्हते. प्रभावी समुपदेशन हाच अशा समस्यांवरील प्रभावी उपाय आहे, असे प्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी सांगितले.