लाखो मुंबईकरांना दर दिवशी आपल्या जीवावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या बेस्ट बसगाडय़ांच्या चालकांची एक चूकही अनेकांच्या जीवावर बेतू शकते. मात्र सध्या ‘बेस्ट’चे चालक ही आपली जबाबदारी विसरले की काय, अशी शंका यावी ही परिस्थिती आहे. गाडी चालवता चालवता मोबाइलवर बोलणाऱ्या तब्बल २७ चालकांना गेल्या सहा महिन्यांत कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्याव्यतिरिक्त आणखी १८ चालकांची खातेनिहाय चौकशी चालू आहे. थोडक्यात मोबाइलवर बोलताना गाडी चालवल्याबद्दल दरमहा सरासरी सात बस चालकांना पकडण्यात आले आहे.
यासंदर्भात प्रवाशांकडूनच प्रशासनाकडे अशा प्रकारच्या तक्रारी गेल्या आहेत. गाडी चालवत असताना चालकाने मोबाइलवर बोलणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र अनेक बसचालक सर्रास मोबाइलवर बोलताना आढळतात. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ‘बेस्ट’च्या १४ अपघातांत १४ जणांचा मृत्यू झाल्याचेही निदर्शनास आले आहे. तर ३२ किरकोळ अपघात झाले आहेत. अपघातांची संख्या एवढी वाढली असताना चालकांनी मोबाइलवर बोलत गाडी चालवणे धोकादायक आहे.
प्रवाशांनी केलेल्या या तक्रारींची दखल घेत बेस्ट प्रशासनाने मोबाइलवर बोलत गाडी चालवणाऱ्या चालकांविरोधात मोहीम उघडली. या मोहिमेचा परिपाक म्हणून फेब्रुवारी २०१३ पासून जुलै २०१३ पर्यंत २७ जणांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला. या २७ जणांपैकी चार चालकांना समज देऊन सोडून देण्यात आले आहेत. तर ११ जणांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. १० चालक निलंबित झाले असून दोन चालकांना बडतर्फ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे १८ जणांची चौकशी अद्याप सुरू असून त्यांच्यावर कोणती कारवाई करायची, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
मोबाइलवर बोलत बस चालविणाऱ्या बेस्टच्या २७ चालकांवर कारवाई
लाखो मुंबईकरांना दर दिवशी आपल्या जीवावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणाऱ्या बेस्ट बसगाडय़ांच्या चालकांची एक चूकही अनेकांच्या जीवावर बेतू शकते.
First published on: 06-09-2013 at 06:38 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action on the 27 best drivers