जळगाव जिल्ह्यातील केवळ तीन तालुक्यांचा अपवाद वगळता १२ तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झाले असून विहिरीतील गाळ काढणे, विहिरींची खोली वाढविणे, कूपनलिकांना मान्यता, पाण्याचा काटकसरीने वापर आदी तत्सम उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. हिवाळ्यात टंचाईची ही स्थिती असल्याने उन्हाळ्यात या संकटाने गंभीर स्वरूप धारण करू नये म्हणून यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे. या कामात कुचराई करणारे ग्रामसेवक व शासकीय अधिकारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. बैठकीस अनुपस्थित ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली.
टंचाईचा आढावा घेण्यासाठी चाळीसगाव येथे आयोजित बैठकीत या संकटावर मात करण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपायांवर चर्चा झाली. राज्यात १२३ तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांत उपाययोजना करण्यासाठी शासनाने मोठय़ा प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला आहे. या गावांना टंचाईच्या झळा बसू दिल्या जाणार नसल्याचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी नमूद केले. पाणीटंचाईबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेणे आणि सरपंचांच्या समस्या जाणून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनी शासकीय उपाययोजनांसोबतच लोकसहभागातून विहिरीतील गाळ काढणे, विहिरीची खोली वाढविणे आदी तत्सम कामे करण्याचे आवाहन केले. लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकांनी आपापल्या भागातील प्रस्ताव त्वरित पाठविणे आवश्यक आहे. पदाधिकारी, ग्रामस्थ व प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मात करणे शक्य होईल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. भू-जल सर्वेक्षण विभागाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. परिणामी, सर्वेक्षणाच्या कामात दिरंगाई होत असल्याचा मुद्दा या वेळी पुढे आला. या विभागाला पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यात ३५ कूपनलिका मंजूर झाल्या असून, त्यापैकी ११ कूपनलिकांचे काम पूर्णत्वास आले आहे. बहुतांश पदाधिकाऱ्यांनी कूपनलिका, विहीर खोदणे, पाण्याचे आवर्तन सोडणे, विहिरीत आडव्या कूपनलिका घेणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, वीजजोडणी खंडित करू नये आदी समस्यांकडे लक्ष वेधून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली.वीज कंपनीने कोणत्याही गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा