या शहरातील शंभर ते दीडशे वष्रे जुन्या इमारती, तसेच पंधरा ते वीस वर्षांपूर्वी बांधलेले बहुतांश फ्लॅट जीर्ण झाले असून कधीही पडून मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. अशा जीर्ण इमारतींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता समोर आली आहे.
 ऐतिहासिक चंद्रपूर शहरात प्राचीन व जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. शंभर ते दीडशे वष्रे वयोमान असलेल्या या इमारती कधीही पडण्याची शक्यता आहे. त्या पडून जीवहानी होण्यापूर्वीच पालिकेने लक्ष घालून अशा जीर्ण इमारतींच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
या शहरात महात्मा गांधी मुख्य मार्गावर, तसेच गोल बाजार, जटपुरा गेट, गंज वॉर्ड, विठ्ठल मंदिर वॉर्ड, समाधी वॉर्ड, अंचलेश्वर मंदिर परिसरात अशा जीर्ण इमारती मोठय़ा प्रमाणावर आहेत. या सर्व इमारतींवर कारवाई करावी, अशीही मागणी होत आहे.
 मात्र, महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष झालेले आहे. दोन दिवसांपूर्वीच विठ्ठल मंदिर वॉर्डात काशीनाथ सहनिवास या फ्लॅट स्कीमच्या इमारतीची संरक्षण भिंत कोसळली. यात ओम विकास खटी हा बारा वर्षांचा मुलगा जखमी झाला तर त्याच्या सायकलचे मोठे नुकसान झाले.
 या इमारती सोबतच शहरातील बहुतांश फ्लॅट स्किमचे बांधकाम असेच निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामुळे अशा जीर्ण इमारतींवर कारवाई करावी या आशयाचे निवेदन विकास खटी यांच्यासह अनेकांनी आयुक्त प्रकाश बोखड यांना दिले आहे.
या निवेदनाचा विचार करून लवकरच कारवाईला प्रारंभ करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action should be on old buildings