मेडिकल प्रशासनाचे कठोर पाऊल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मधील प्रसूती विभागामध्ये महिला मदतनीस प्रसूत महिलांकडून भेट देण्याच्या नावाखाली जबरदस्तीने पैसे उकळत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याची गंभीर दखल घेऊन मेडिकल प्रशासनाने या ‘चिरमिरी’ ला लगाम घातला असून यापुढे असे प्रकार आढळल्यास मदतनीस महिलांना थेट घरचा रस्ता दाखविला जाणार आहे.
मेडिकल रुग्णालयात वार्ड क्रमांक २२ आणि ३० दे दोन वार्ड प्रसुतीसाठी असून या ठिकाणी विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि आंध्रप्रदेशातून गरीब महिला रुग्ण मोठय़ा संख्येने प्रसुतीसाठी येत असतात. त्यामुळे दोन्ही वॉर्ड नेहमीच हाऊसफुल्ल असतात. अनेकदा केवळ खाटा हाऊसफुल्ल राहत असल्यामुळे अनेकांना महिलांना जमिनीवर उपचार घ्यावा लागतो. दररोज किमान २० ते २५ प्रसूती होत असतात. या दोन्ही वॉर्डामध्ये पाच ते सहा महिला मदतनीस म्हणून काम करीत असतात. (मावशी) या मदतनीस महिलांचे बाळाचे कपडे धुण्यापासून वॉर्डातील इतर किरकोळ कामे करीत आहेत. या मदतनीस महिलांना प्रशासनाकडून मानधन दिले जाते. या व्यतिरिक्त प्रत्येक प्रसूत महिलेकडून कपडे धुण्याचे कारण सांगून शंभर ते दोनशे रुपये घेतले जात आहेत. मेडिकलमध्ये प्रसुतीसाठी येणाऱ्या अनेक महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्या मदतनीसांना पैसे देऊ शकत नाही. पैसे मिळत नसल्यामुळे मदतनीस त्यांची कामे करीत नसल्याच्या तक्रारी मेडिकल प्रशासनाकडे आल्या आहेत.
काही महिला स्वखुशीने त्यांना १०० ते २०० रुपये भेटीदाखल देत असतात मात्र त्या मुलगा झाला तर ५०० रुपये आणि मुलगी झाली तर ३०० रुपयासह पेढय़ाचा डबा मागतात, अशा तक्रारी काही महिलांच्या नातेवाईकांनी मेडिकल प्रशासनाकडे केल्या आहेत. अनेक गरीब महिलांकडून जबरीने पैसे उकळले जात आहेत. या सर्व ‘चिरीमिरी’ प्रकरणाची तक्रार बघता मेडिकल प्रशासनाने प्रसूती विभागातील महिला डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना अशा मदतनीस महिलांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले. ज्या मदतनीस महिलांच्या संदर्भात तक्रार होती त्या महिलांना डॉक्टरांकडून कडक शब्दात समज देण्यात आली आहे. यानंतर तक्रार आल्यास किंवा कुणा प्रसूती झालेल्या महिलेकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्यास मदतनीस असलेल्या मावशींना सरळ घरचा रस्ता दाखविण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला. मदतनीस महिलांनी पैसे मागितल्यास संबंधीत विभागाच्या डॉक्टरांकडे किंवा वैद्यकीय अधिष्ठात्यांकडे तक्रार करावी असे आवाहन मेडिकल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा