लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला दोन दिवस शिल्लक असताना पुन्हा जवळपास एक महिन्यानंतर विदर्भातील काही प्रमुख राजकीय पक्ष व उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार याचे अंदाज लावले जात आहे.
विदर्भातील दहाही मतदारसंघातील निवडणूक दुसऱ्या टप्यात आटोपल्यानंतर विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि उमेदवार अन्य राज्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले तर कार्यकर्ते निकालाला अवकाश असल्यामुळे फिरायला गेले होते. निवडणुकीचा शेवटचा टप्पा आटोपताच सर्वाना निकालाचे वेध लागले आहे. विविध वाहिन्यांनी दिलेल्या जनमत चाचणीच्या अंदाजानुसार भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येणार असल्याचे वातावारण असल्यामुळे पक्षाच्या कार्यकत्यार्ंमध्ये आनंदाचे वातावरण आहे तर काँग्रेससह अन्य पक्षाचे कार्यकर्ते वाट पाहा असे सांगून आमच्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल हे पटवून देत आहेत. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाचे मॉडेल मिल परिसरात, काँग्रेसचे सीताबर्डीवर, बसपाचे उत्तर नागपुरात आणि आम आदमी पक्षाचे धंतोली भागात प्रचार कार्यालय होते. निवडणुकीनंतर जवळपास सव्वा महिना बंद कार्यालये पुन्हा उघडण्यात आली आहेत. भाजपच्या धंतोली आणि टिळक पुतळ्याजवळील कार्यालयात गेल्या पाच सहा दिवसांपासून पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून विजयी जल्लोषाची तयारी केली जात आहे. गडकरी यांचा विजय निश्चित असल्याचा आशावाद पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांला आणि पदाधिकाऱ्याला असल्यामुळे जल्लोषाची तयारीसाठी समिती तयार करण्यात आली आहे. जनमत चाचणीनुसार काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नसले तरी पक्षाचे कार्यकर्ते आशावादी आहे.
यावर्षी विदर्भातील बहुतेक लोकसभा मतदारसंघात दुहेरी तर काही ठिकाणी तिहेरी लढत होती त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता कमी असली तरी प्रत्यक्षात आपल्या उमेदवाराला किती मते मिळू शकतात याचा आराखडे तयार केले जात आहे. मतमोजणी केंद्रावर कोण जाणार, बाहेर कोण उभे राहणार आहे, उमेदवारांसोबत कोण राहणार आहे याबाबत चर्चा करून कार्यकर्त्यांची नावे निश्चित केली जात आहेत. शहरातील बहुतेक उमेदवारांच्या कार्यालयात फेरफऱ्टका मारला असता कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली. निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर संदल, गुलालाची व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले. उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी गेलेले भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते पुन्हा परतले आहेत. मतदान आटोपल्यानंतर अडगळीच्या खोलीत ठेवलेले झेंडे, फलक पुन्हा एकदा बाहेर काढले जात आहे. काही अपक्ष उमेदवारांनी भाडय़ाने घेतलेली प्रचार कार्यालये बंद करून आपल्या घरीच कार्यालय सुरू केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या धंतोलीतील कार्यालयात काही प्रमुख कार्यकर्ते कोणाला किती मते मिळू शकतील याचे अंदाज बांधत आहे.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातून निकाल कळण्याच्या दृष्टीने तयारी केली जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून त्यात कार्यकत्यार्ंना सूचना देण्यात आल्या आहे. काँग्रेसच्या देवडिया भवनात प्रमुख कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्षाच्या कार्यालयात फारशी वर्दळ नसली तरी काही प्रमुख पदाधिकारी मात्र मतमोजणीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांंना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देत आहेत. प्रसार माध्यमांनी आणि काही निवडणूक विश्लेषकांनी भारतीय जनता पक्ष सत्तेवर येणार असल्याचे भाकित केल्याने कार्यकर्त्यांंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विदर्भात कोण उमेदवार जिंकू शकतो, नितीन गडकरी यांचा विजय किती मतांनी होऊ शकतो, विदर्भात भाजपला किती जागा मिळू शकतात,काँग्रेसचा कोण कोण उमेदवार पराभूत होऊ शकतात, या सर्व विषयावर सध्या विदर्भातील विविध मतदारसंघात चर्चेला उधाण आले आहे.
पक्ष कार्यालयांमध्ये पुन्हा चहलपहल
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला दोन दिवस शिल्लक असताना पुन्हा जवळपास एक महिन्यानंतर विदर्भातील काही प्रमुख राजकीय पक्ष व उमेदवारांच्या कार्यालय आणि निवासस्थानी कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार याचे अंदाज लावले जात आहे.
First published on: 14-05-2014 at 08:13 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Activeness in party offices