देशाच्या संरक्षणार्थ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची भूमिका महत्त्वाची आहे. जवानांनी दहशतवाद निपटून काढत शांतता प्रस्थापित करावी व बीएसएफसह आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन गुजरातमधील सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक अरुणकुमार सिन्हा यांनी केले.
चाकूर येथील सीमा सुरक्षा दलाच्या सहायक प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षित जवानांचे परीक्षण करताना ते बोलत होते. प्रशिक्षण केंद्राचे उपमहानिरीक्षक राजेंद्रसिंह मंडराल, द्वितीय कमांडंट विशाल राणे, डॉ. सुरेंद्र पानसंबळ, अजय छत्री, तहसीलदार विक्रम देशमुख, अ‍ॅड. लिंगराज पाटील उपस्थित होते. सीमा सुरक्षा दलाच्या या तुकडीत महाराष्ट्र, गुजरात, आसाम, झारखंडमधील जवानांची भरती झाली असून, सर्वाधिक जवान महाराष्ट्रातील आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, चंद्रपूर, नागपूर, पुणे जिल्ह्य़ांतील तरुणांचा यात समावेश असल्यामुळे अनेक जवानांचे आई-वडील, नातेवाईक आपल्या मुलाचे कौतुक पाहण्यासाठी आले होते. मे २०१२ पासून कमाडंट विशाल राणे, अजय छत्री, अजय पंत, प्रणव शर्मा या अधिकाऱ्यांनी ३४ आठवडय़ांचे प्रशिक्षण जवानांना दिले. उपकमांडंट अजय छत्री यांनी जवानांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संजय दुमाने, गणेश पाटील, रविकिरण अगुलपरे, स्वप्नील शेरवांडे, कृष्णा खाड, प्रवीण सोयलाव, परमेश्वर भोयर, भागीनाथ पवार, पुरुषोत्तम मानकर या जवानांना सिन्हा यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. १४ मे २०१२ मध्ये भरती झालेल्या ३४९ जवानांचा दीक्षान्त समारंभ शिवाजी परेड मैदानावर झाला. सीमा सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राची स्थापना २००७ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुढाकारामुळे झाली.

Story img Loader