भारतीय चित्रपटाच्या शतसांवत्सरिक वर्षपूर्तीनिमित्ताने प्रभात चित्र मंडळ या मुंबईतील आघाडीच्या फिल्म सोसायटीतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला आणि चित्रपट कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता सचिन पिळगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा महोत्सव १४ ते १७ मेदरम्यान आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभात चित्र मंडळाचे सरचिटणीस संतोष पाठारे यांनी दिली.
यावर्षीही राष्ट्रीय स्तरावर सवरेत्कृष्ट चित्रपट ठरलेल्या ‘धग’सह ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘संहिता’ या तीन मराठी चित्रपटांबरोबरच ‘सेल्यूलॉईड मॅन’, ‘कातळ’, ‘इत्र मातरम’, ‘आभास’, ‘हाऊसफुल्ल’, ‘लेसन्स इन फरगेटिंग’ इत्यादी पुरस्कारविजेते चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. चार दिवसांच्या या महोत्सवात नरिमन पॉइंट येथील चव्हाण सेंटर आणि प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी मिनी थिएटर अशा दोन ठिकाणी चित्रपट दाखविण्यात येतील.
या चित्रपट महोत्सवाची सुरुवात १४ मे रोजी ‘इन्व्हेस्टमेंट’ने होत असून प्रत्येक राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटाच्या खेळापूर्वी संबंधित दिग्दर्शक-निर्माते-कलावंत यांचा सत्कार करण्यात येणार आहे. चित्रपट शताब्दीनिमित्त राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटांबरोबरच हिंदी सिनेमात योगदान देणाऱ्या राज कपूर, स्मिता पाटील, अशोक कुमार, हृषिकेश मुखर्जी, मोहम्मद रफी यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारे माहितीपटही दाखविण्यात येणार आहे.  चित्रपट शताब्दीनिमित्त प्रभात चित्र मंडळाने ‘सिनेमा इन माय परसेप्शन’ या विषयावर लघुपट स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेसाठी जवळपास ५० प्रवेशिका आल्या होत्या. विजेत्या लघुपटांचे खेळ आणि या लघुपट दिग्दर्शकांना घसघशीत रकमांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. हे सर्व विजेते लघुपट या महोत्सवात दाखविण्यात येणार आहेत. रसिकांनी या चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रभात चित्र मंडळ, शारदा सिनेमा बिल्डिंग, पहिला मजला, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयासमोर, नायगाव, दादर पश्चिम या पत्त्यावर अथवा ०२२-२४१३१९१८ या क्रमांकावर दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत अथवा प्रभातचित्रमंडळडॉटओआरजी या संकेतस्थळाद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.

Story img Loader