नृत्य हा त्याचा श्वास आहे, ध्यास आहे, अभ्यास आहे आणि वेडही आहे. आपल्याकडील लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य आणि पाश्चिमात्य शैलीचा अंगीकार करत विकसित झालेली बॉलीवूडची नृत्यशैली या सगळ्यांबद्दल तो झपाटून बोलतो. पण नुसतेच बोलण्यावर तो थांबलेला नाही. ‘तो नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा’. डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून तो सर्वाना माहीत आहे. मात्र ‘एबीसीडी- एनीबडी कॅन डान्स’ या नृत्यावर आधारित पहिल्यावहिल्या थ्रीडी चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून तो नवी ओळख निर्माण करू पाहतो आहे. नृत्य हाच त्याचा ‘वीक पॉइण्ट’ असल्याने तोच धागा पकडून रेमोशी केलेल्या गप्पा..

डीआयडीचा परीक्षक ते चित्रपट दिग्दर्शक फार लवकर हा पल्ला गाठलास..
नृत्यावर आधारित चित्रपट करायचा हे बऱ्याच वर्षांपासून मनात घोळत होतं. खरं सांगायचं तर मुंबईत मी आलो तेच दिग्दर्शक व्हायचं स्वप्न उराशी बाळगून. त्यामुळे ‘एनीबडी कॅन डान्स’च्या निमित्ताने एक प्रकारे माझं हे पहिलं स्वप्न पूर्ण होत आहे. नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत असताना एकीकडे अनुभवाची शिदोरी जमा होत होती, नृत्याचा अभ्यास सुरू होता. ‘डीआयडी’चा परीक्षक म्हणून एक वेगळी ओळखही मिळाली. या सगळ्याचा एकत्रित फायदा मला दिग्दर्शक म्हणून ‘एबीसीडी’ करताना झाला.
पहिलाच चित्रपट तोही नृत्यावर, मग थ्रीडी करण्यामागे काय विचार होता?
सध्या टीव्हीवर एवढे डान्स रिअ‍ॅलिटी शो सुरू आहेत. चित्रपटांमधील गाणी २४ तास दाखवली जातात. त्यामुळे या ना त्या कारणाने तुम्ही सतत नृत्य बघतच असता. पण त्यापलीकडे जाऊन नृत्याला एक वेगळं स्वरूप देऊन त्याबद्दलचं अप्रूप आहे ते लोकांसमोर उलगडावं हा एक प्रयत्न होता. आणि थ्रीडीसारखं नृत्यासाठी चांगलं माध्यम नाही. कारण त्यातली नजाकत, त्यातले आखीवरेखीवपण थ्रीडीमध्ये फार स्पष्टपणे पाहता येतं, जवळून अनुभवता येतं. नृत्य या पद्धतीने अनुभवता यावं हाच विचार थ्रीडी चित्रपट करण्यामागे होता.
‘एबीसीडी’च्या निमित्ताने प्रभुदेवा, गणेश आचार्य यांच्यासारखे नावाजलेले नृत्यदिग्दर्शक आणि ‘डीआयडी’ची तरुण मुलं एकाच व्यासपीठावर होती..
ती फार धमाल होती. ‘एबीसीडी’चे चित्रीकरण म्हणजे फक्त नृत्य, नृत्य आणि नृत्य असेच वर्णन करावे लागेल. मग ते कोणीही करेना. प्रभुदेवा करू देत किंवा तरुण सलमानचं नृत्य असू देत. या चित्रपटाचा प्रत्येक क्षण आमच्या सगळ्यांसाठी अविस्मरणीय होता. म्हणजे ज्यांचा शॉट असेल ते तर नृत्य करायचेच, पण ज्यांचा शॉट नसेल तेही मागे कुठेतरी सेटवर नृत्य करीत असायचे. त्यातून नवीनच काहीतरी प्रकार जन्माला यायचा. तिथे अनुभवीही होते आणि नवखेही होते. ज्याला जे हवं त्याने ते घ्यावं आणि शिकावं इतका सुंदर माहौल या चित्रपटाच्या निमित्ताने आम्हाला मिळाला.
नृत्यदिन देशात साजरा केला जावा अशी विनंती तू सरकारकडे केली आहेस. त्याविषयी सांगशील?
आपल्या देशात नृत्यकला फार विकसित आहे. कितीतरी अभिजात, प्राचीन नृत्यांचे प्रकार आपल्याकडे आहेत. आपल्याकडे प्रत्येक राज्यात तिथल्या खेडोपाडय़ांत स्वत:चं असं लोकनृत्य आहे. त्याशिवाय कथ्थक, भरतनाटय़म, ओडिसी, कुचिपुडी असे शास्त्रीय नृत्याचे प्रकारही आहेत आणि त्यात प्रवीण असलेले कितीतरी कलाकारही आहेत. पण तरीही आपल्याकडे नृत्यकलेचा एकत्रित ठसा उमटलेला पाहायला मिळत नाही. इथे गाण्यांच्या मैफली होतात, महोत्सव होतात पण शास्त्रीय नृत्य सोडले तर नृत्याचे फारसे कार्यक्रम होत नाहीत. म्हणून असा एक दिवस असावा ज्या दिवशी देशभर ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम सादर केले जातील. जेणेकरून तरुण पिढीला आपल्या शास्त्रीय नृत्याबरोबरच लोकनृत्याचीही ओळख होईल, त्याची आवड निर्माण होईल, असा विचार मनात घोळत होता. आपण जितक्या सहजतेने शिक्षक दिन, फादर्स डे, मदर्स डे साजरे करतो तितक्याच सहजतेने ‘डान्स डे’ही साजरा करता येऊ शकतो. म्हणूनच मी केंद्र सरकारकडे नृत्यदिन साजरा केला जावा असे निवेदन दिले आहे आणि त्याला मान्यता मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
रिअ‍ॅलिटी शोमुळे आजच्या मुलामुलींना आपली कला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे असे वाटते का?
आजची आमची पिढी खरोखरीच सुदैवी आहे. सध्या नव्याने येऊ पाहणारे अनेक नृत्य दिग्दर्शक हे रिअ‍ॅलिटी शोंच्या व्यासपीठावरून पुढे आले आहेत. ज्याच्या अंगी कला आहे, गुणवत्ता आहे आणि मेहनत करण्याची तयारी आहे, तो नक्कीच आजच्या घडीला यशस्वी नृत्यदिग्दर्शक होऊ शकतो असे मी विश्वासाने सांगेन.
तू नृत्यावर आधारित पुस्तक लिहितो आहेस..
‘एबीसीडी’ प्रदर्शित झाला की मी पूर्ण वेळ या पुस्तकावर काम करणार आहे. नृत्यावर आधारित चित्रपट करायचा हे जसं माझं स्वप्न होतं तसंच भारतीय शास्त्रीय आणि लोकनृत्य, परंपरा यांची ओळख करून देणारं पुस्तक लिहावं ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. त्याचं कामही मी सुरू केलं आहे.
यशस्वी नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शक म्हणून प्रभुदेवाचं नाव घेतलं जातं, तो अभिनयही छान करतो..
नाही नाही.. प्रभु सरांसारखा अभिनयाचा विचार मी कधीच केलेला नाही. नृत्य हे अंगातच आहे आणि दिग्दर्शन म्हणजे मगाशी म्हटले तसे ते करण्यासाठीच तर मी इथे आलो होतो. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून माझा प्रवास आता कुठे सुरू झाला आहे.

Story img Loader