पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सन १९३६ पासून सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याची परंपरा सुरू आहे. या नंदादीप उत्सवाचे यंदा ७८ वे वर्ष असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींसह महाराष्ट्रातील ६३ गावांतील तब्बल १३०० नंदादीप श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून रात्रंदिवस येथे तेवत ठेवले आहेत. परंपरेने या उत्सवास वेगळे महत्त्व आहे. हा दीपोत्सव पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
सध्या येथे १३०० नंदादीप तेवत आहेत. प्रत्येक वर्षी अनेक लोकप्रतिनिधींच्या समई तेवत आहेत. त्यात मारूल हवेलीचे पुत्र माजी खासदार व सध्याचे त्रिपुराचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार विक्रमसिंह पाटणकर, माजी आमदार शंभूराज देसाई, टाटा मोटर्सचे कामगार प्रतिनिधी सुजित पाटील, वारणा उद्योग समूहाच्या शोभाताई कोरे आदी मान्यवरांच्या समयांचा समावेश आहे. उत्सवात पाटण तालुक्यासह पुणे, मुंबई, खोपोली, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह अनेक गावांतील भाविकांच्या समई येत असल्याचे दिसत आहे. येत्या २५ ऑगस्टला नंदादीप उत्सवाचा भंडारा होणार आहे. त्यानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नंदादीप उत्सव समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सव अधिकाधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
सन १९३६ मध्ये (कै.) कृष्णा पाटील, कृष्णा मुकादम, कृष्णा सुतार, जीवाजी जाधव व सौदागर हिरवे या पाच ग्रामस्थांनी उत्सवास प्रारंभ केला. श्रावण मासात सिध्देश्वर मंदिरात समई तेवत ठेवून एखाद्या नवसाची पूर्तता केली जाते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. अनेक श्रध्दाळुंनी नंदादीप उत्सवात व्यसने सोडल्याची उदाहरणे आहेत. हा उत्सव भाविकांचे मनोबल व सामथ्र्य वाढविते अशी आख्यायिका आहे. गेल्या ७८ वर्षांत नवसपूर्ती होत असल्याने दिवसेंदिवस समईच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला पाच समया होत्या. सध्या येथे १३०० नंदादीप तेवत आहेत.
नंदादीप उत्सवाच्या झळाळीत भरच!
पाटण तालुक्यातील मारूल हवेलीत सन १९३६ पासून सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून शेवटच्या सोमवापर्यंत नंदादीप लावण्याची परंपरा सुरू आहे.
First published on: 14-08-2013 at 01:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Addition in shining of nandadeep festival