पाणीटंचाईची तीव्रता वाढली
पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मराठवाडय़ात या आठवडय़ात ६४ टँकर वाढले आहेत. मजुरांची उपस्थितीही काहीअंशी वाढली असली, तरी ज्या क्षमतेची कामे प्रशासनाने मंजूर केली आहेत, तेवढय़ा संख्येत अजूनही मजूर उपलब्ध नाही, अशीच नोंद सरकारदरबारी आहे. त्यामुळे मराठवाडय़ातून मजुरीसाठी स्थलांतर होत आहे का, यावर आता प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे.
गेल्या आठवडय़ापर्यंत मराठवाडय़ात ५२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. या आठवडय़ात त्यात वाढ झाली असून ५८७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १६१ टँकरने पाणीपुरवठा होत असून मराठवाडय़ात सर्वाधिक टँकर या जिल्हय़ात आहेत. जालन्यात १४२, बीडमध्ये १०८, तर उस्मानाबादमध्ये १४२ टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जालना, उस्मानाबाद व परंडा येथील नागरी भागात टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. मजुरांच्या संख्येत मात्र काहीशी वाढ झाली असली तरी हाती घेतलेली कामे आणि मजुरांची उपस्थिती हे प्रमाण व्यस्तच आहे. कामे उपलब्ध असून मजूरच कामावर येत नाही, असे चित्र सरकारदरबारी आहे. तथापि, ग्रामीण भागातून काम मिळत नसल्याच्या तक्रारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी आढावाही घेतला. हाताला काम मिळायलाच हवे, अशा पद्धतीचे नियोजन केले असल्याचे अधिकारी सांगतात. त्यामुळे रोजगार हमी योजनेत कामे उपलब्ध असतानाही ओरड का होत आहे, याचा नव्याने आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा