नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी कोंबडीवडे, चिकन तंदुरी, सागुती, चिकन आणि मटन बिर्याणी असे अनेक ‘प्लॅन्स’ आखले आहेत. हे प्लॅन्स पार पाडण्यासाठी अनेकांचे ‘श्रम’ कारणी लागणार आहेत. त्याचबरोबर अनेकांची ‘आहुती’ही पडणार आहे. नेहमीपेक्षा मंगळवारी सुमारे ७ हजार जादा बकरे आणि सुमारे ३५ ते ४० लाख कोंबडय़ांची आहुती या ‘स्वागतयज्ञा’मध्ये पडणार आहे.
मुंबईमध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कल्याण, भिवंडी येथून बकरे आणले जातात. मुंबईत येणारे बकरे पालिकेच्या देवनार पशुवधगृहामध्ये उतरविले जातात. प्रामुख्याने मंगळवार आणि शनिवारी तेथे बकऱ्यांचा बाजार भरविला जातो. मुंबईत सर्वसामान्यपणे दर मंगळवारी १२-१२ हजार बोकड येतात. मात्र ३१ डिसेंबरची धूम लक्षात घेता या मंगळवारी सुमारे २०,००० बकरे येणार आहेत. एका बकऱ्याचे सरासरी १३ किलो मांस विक्रीसाठी उपलब्ध होते. याचाच अर्थ सुमारे ९० ते ९५ हजार किलो जादा मटणाची व्यवस्था होणार आहे.
दर रविवारी मुंबईत साधारण १० ते १२ लाख कोंबडय़ांची आवक होते. मात्र नववर्षांच्या स्वागताच्या पाटर्य़ामध्ये खवय्यांकडून कोंबडीच्या निरनिराळ्या प्रकारांना प्रचंड मागणी असते. स्वाभाविकच ३०-३१ डिसेंबरला कोंबडय़ांची मागणी प्रचंड वाढते. मागील वर्षी सुमारे २५ लाख कोंबडय़ा या दोन दिवसांत कापल्या गेल्या होत्या. यंदा हा आकडा ३५ ते ४० लाखांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात ही आकडेवारी फक्त मुंबई शहराची नाही. आसपासच्या ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, वसई, विरार अशा बृहत्मुंबई परिसराचे हे आकडे आहेत.  
जरा काळजी घ्या..
देवनार पशुवधगृहामध्ये बकऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. आजारी बकरे बाजूला केले जातात. त्यानंतर ग्राहकापर्यंत पोहोचविण्यापूर्वीही मांसाची तपासणी होते. परंतु काही व्यापारी जिवंत बकरे खरेदी करून आपल्या दुकानात घेऊन जातात आणि आवश्यकतेनुसार त्यांची अनधिकृत कत्तलखान्यांमध्ये कत्तल केली जाते. हे बकरे खाण्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे जरा जपून.

Story img Loader