दूषित पाण्याने आजारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणावरून उजेडात आलेल्या गोंदिया जिल्ह्य़ातील जमाकुडो येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील एका विद्यार्थ्यांचा ३ मार्चच्या मध्यरात्री नागपूर येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाने आता मात्र ही आश्रमशाळा अडचणीत आली आहे.
विशेष म्हणजे, आदिवासी संघटनांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आश्रमशाळेचे अधीक्षक व प्राचार्यावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मृत विद्यार्थ्यांचे नाव संदीप सदाराम टेकाम (१२,रा. मुरकुडोह क्र.२) असून तो सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होता. २८ फेब्रुवारीला संदीप टेकामच्या दोन्ही पायात असह्य़ वेदना होऊन त्याची प्रकृती आश्रमशाळेतच बिघडली होती. यावर त्याला त्याच दिवशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करवून परत आणले होते. मात्र, १ मार्चला परत तोच त्रास उद्भवल्याने त्याच्यावर सालकेसा येथील ग्रामीण रुग्णालयात २४ तास उपचार करवून त्याला २ मार्चला गोंदियातील केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर केटीएस रुग्णालयातून त्याला नागपूरला पाठवण्यात आले. मात्र, नागपूर येथे उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला व तेथेच उत्तरीय तपासणी करून मृतदेह परत गावी नेला जाणार आहे.
या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र अंसतोष दिसून येत आहे. अधीक्षकांच्या दुर्लक्षामुळे संदीपचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. संदीपला योग्य उपचार मिळाला असता तर त्याचा नाहक जीव गेला नसता अशी चर्चा सुरू आहे. घडलेल्या प्रकाराबाबत अधिक जाणून घेण्यासाठी आश्रमशाळेचे अधीक्षक आर.एम. गावडे यांच्या मोबाईलवर  संपर्क केला असता मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ते संदीपच्या कुटुंबीयांसोबत नागपूरला गेले असल्याची माहिती मिळाली. मात्र, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनने याप्रकरणी तहसीलदार जी.एन. खातेकर यांना
निवेदन दिले. निवेदनात अधीक्षक व प्राचार्यावर कारवाई तसेच मृताच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा