रस्ता आहे, पण बस नाही. काही ठिकाणी रस्ताच नाही, त्यामुळे शिकायचे कसे? तर जीव मुठीत घेऊन! जालना जिल्ह्य़ातील एकटय़ा जाफराबाद तालुक्यातच ३७ गावांमधील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांची शाळेसाठी रोजची जीवघेणी लढाई थांबता थांबत नाही. ढिम्म प्रशासन आणि उदासीन लोकप्रतिनिधी यांच्यामुळेच ही स्थिती उद्भवली आहे.
शाळेपर्यंत जाण्यास धड रस्ता तर नाहीच. परंतु जेथे कोठे रस्ता आहे, तेथे बसही जात नाही. काही ठिकाणी बस येते, पण शाळेच्या वेळेशिवाय, असाच सारा खेळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळला जात आहे. चापनेर, बोरी, निमखेडा, मेरखेडा, चिंचखेडा, धोडखेडा, बेलोरा, देऊळगाव उगले आदी गावांमधील विद्यार्थिनींनी तहसीलदारांचे या बाबत लक्ष वेधले. आम्हाला शाळेपर्यंत सोडा, अशी मागणी गावोगावी केली गेली. विशेषत: मुलींनी यात पुढाकार घेतला. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट महिन्यात पडणाऱ्या पावसामुळे मोठीच अडचण जाणवू लागली आहे. नदी-नाले वाहू लागले आहेत आणि शाळेपर्यंत पोहोचायचे असेल तर जीव मुठीत घेऊन पाण्यातूनच ये-जा करावी लागते.
मराठवाडा व विदर्भाच्या सीमेलगतच्या गावांमधील विशेषत: जाफराबाद व देऊळगाव राजा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यासाठी मानव विकास मिशनमार्फत विशेष बस उपलब्ध केल्या आहेत. राज्यातील २२ जिल्ह्य़ांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची सोय व्हावी, म्हणून १२० बस देण्यात आल्या. मात्र, या बसचे मार्ग शाळेच्या वेळेनुसार ठरले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांना याचा लाभ घडत नसल्याच्या २०-२२ तक्रारी मानव विकास आयुक्तालयाकडे आल्या. संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी हा प्रश्न हाताळावा, अशा सूचनाही दिल्या गेल्या. पुढे त्याचे काहीच झाले नाही.
जाफराबाद तालुक्याच्या सोनखेडा, गोंदनखेडा व सावरखेडा या गावातील विद्यार्थ्यांना ४ ते ५ किलोमीटर अंतर कापून शिपोरा येथील शाळेत जावे लागते. देऊळगाव राजा तालुक्याच्या किन्ही व नादखेडा गावातील विद्यार्थ्यांना तब्बल १० ते १२ किलोमीटर दररोज पायपीट करावी लागते, अशी माहिती स्वयंसेवी संस्थेने संकलित केली आहे. अनेक गावांमध्ये कच्चे रस्ते असल्याने बस जाणार नाही, असे एस. टी. महामंडळाने कळविले. या अनुषंगाने जाफराबादच्या तहसीलदार सुमन मोरे म्हणाल्या की, रस्ते आहेत, पण कच्चे. काही वेळा तिकडे गाडी जाणार नाही, असे कळविले जाते. काही गावात वेळापत्रकाची समस्या होती. ती सोडवण्यात आली. इयत्ता सहावी ते बारावीत शिकणाऱ्या जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा येथे मुलींनी बसची वेळ बदलून द्यावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर मानव विकासच्या बसचा मार्ग बदलला, वेळही बदलून दिली गेली. यामुळे निवडुंगा व गाणेगव्हाण येथील समस्या संपली. अंधारी, कुसडी, गोंदनखेडा, सोनखेडा, भराडखेडा अशी समस्याग्रस्त गावांची यादी लांबतच आहे.
रस्त्यांची दुरवस्था व वाहतुकीची साधने नसल्याने अनेक मुलींना तर आठवीनंतर शाळेत पाठवलेच जात नाही. गळतीचे प्रमाणही वाढतेच आहे. जालना जिल्ह्य़ातील मुलांच्या समस्यांचा अभ्यास करणारे युनिसेफचे ज्ञानेश रेणगुंठवार म्हणाले की, वाहतुकीची मोठी अडचण आहे. एखादी सहा आसनी रिक्षा असते. शाळेत जाणाऱ्या मुलांना त्याचाच आधार आहे. वेळेवर बस उपलब्ध नाही. काही गावांना तर जायला रस्ताच नाही.
मानव विकास मिशनने मोठय़ा बसऐवजी मिनीबस घेतल्या असत्या तर अधिक गावांना त्याचा फायदा झाला असता. मुलांना शाळेत पोहोचताना कसरत करावी लागते. त्यामुळे गुणवत्ता आणि संपादणूक पातळी असे शैक्षणिक मूल्यमापनाचे निकष ‘नापास’ या श्रेणीतच असतात. शिक्षक मात्र इमानेइतबारे विद्यार्थ्यांना क्षमता प्राप्त झाल्या, अशा नोंदी ठेवत राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा