जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणावर अवैध उत्खनन व नद्यांमधील वाळूचा उपसा होत असताना जिल्हा प्रशासनाची मात्र या बाबत डोळेझाक सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाला वारंवार तक्रारअर्ज देऊनही दखल घेतली जात नसल्याने लिंबाळा तांडा परिसरात ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हिंगोली तालुक्यातील सुतकपिंपरी, एमआयडीसी परिसरातील अवैध वाळूउपसा प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावली. परंतु तपास पुढे सरकला नाही. सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी, बोडखा, तांदूळवाडी शिवारातील नदीतून जेसीबीचा वापर करून रेतीचा उपसा सुरू आहे. हिंगोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी सुतकपिंपरी, एमआयडीसी परिसरातील तत्कालीन तहसीलदार आर. एम. पाटील, जी. एल. जाधव व कार्यरत असलेले व्ही. जे. कडवकर मंडळ अधिकारी, जी. के. कोल्हे, एस. एन. कांबळे, एम. एस. खंदारे, तलाठी यू. एस. सोवितकर, व्ही. एन. येल्लारे या आठ महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. शेख निहाल राजी इस्माईल, प्रसन्ना धरमचंद बडेरा यांच्यासह अवैध उत्खनन करणाऱ्या जागामालकांनी ३ हजार ४४५ ब्रास गौण खनिज निर्मिती करून सरकारचा ५६ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा महसूल बुडविला. या नुकसानीबद्दल बाजार भावाने तिप्पट दंड वसूल का करू नये, अशा आशयाची नोटीस तहसीलदार कडवकर यांनी या जमीन मालकांना बजावली. मात्र, कारवाई झाली नाही.
हिंगोली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासन कागदोपत्री कारवाईच्या पुढे गेले नाही. सेनगाव तालुक्यातील वाळू माफियांच्या दादागिरीविरुद्ध कारवाईसाठी तक्रारअर्ज देऊनही प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा