मजुरीची मागणी करूनही कामे सुरू करण्यात न आल्याने धडगाव तहसील कार्यालयावर डॉ. कांतीलाल टाटिया यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाची दखल घेत प्रशासनाने रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत.
मजुरांनी प्रशासनाच्या मागणीप्रमाणे अर्ज करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत धडगाव तहसील कार्यालयात शुक्रवारी संर्व संबंधितांची बैठक होणार आहे. या बैठकीस रोजगाराची मागणी करणाऱ्या गावातील प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.
वन विभागाच्या कार्यालयापासून दहा दिवसांपूर्वी मजुरांनी धडगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चात तालुक्यातील गौऱ्या, बिजरी, पाडली, चोंदवाडा बुद्रुक, मांडवी खुर्द, शेलकुई, तेलखेडी, खर्डा, वावी, बोदला या गावातील ५०० पेक्षा अधिक मजूर उपस्थित होते. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ अडविण्यात आल्यानंतर तेथे त्याचे सभेत रुपांतर झाले.
 शिवाजी पराडके, कालुसिंग पाडवी, सीताराम पावरा, भरत पावरा यांनी सभेला मार्गदर्शन केले. मनलेश जयस्वाल यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. सभेनंतर तहसीलदार बिरवाह वळवी यांच्या कार्यालयात संबंधित खाते प्रमुख व गटविकास अधिकारी  यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
या बैठकीतून पुढे आलेल्या माहितीमुळे मजुरांना धक्काच बसला. यापुढे ज्यांना रोजगार मागायचा असेल त्यांनी आपले जॉब कार्ड क्रमांक, बँकेतील खाते क्रमांकासह अर्ज करावा, तरच काम उपलब्ध करून देता येईल, असा एक प्रकारचा इशारा तहसीलदारांनी दिला. ज्याच्याकडे जॉब कार्ड नाही त्याने मजुरीसाठी शेजारील राज्यात जावे, असाच त्याचा अर्थ होत असल्याचा आरोप डॉ. टाटिया यांनी केला आहे. मागणी केलेल्या गावांमध्ये कोणताही रोजगार नाही. सध्या प्रशासनातर्फे केवळ घोषणा केल्या जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या सर्व गावांतील मजुरांनी प्रशासनाच्या मागणी प्रमाणे अर्ज करण्याचे ठरविले असून धडगाव तहसील कार्यालयात होणाऱ्या बैठकीस रोजगार मागणी केलेल्या गावातील दोन-दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने माहिती दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे डॉ. टाटिया यांनी सांगितले.