खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच उशिरा का होईना कर्ज वाटपासाठी प्रशासनाने धावपळ सुरू केली असून सहकार खात्याच्या पुढाकाराने आतापर्यंत शेतकऱ्यांना १९१ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. या खरीप हंगामात नागपूर जिल्ह्य़ातील ३५ हजार ६४६ शेतकरी सभासदांना पीक कर्ज वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला १२५ कोटी रुपये, राष्ट्रीयकृत बँकांना ५४४ कोटी २९ लाख रुपये, तसेच ग्रामीण बँकांना २२ कोटी १८ लाख रुपये, असे एकूण ५९१ कोटी ४७ लाख रुपये  कर्ज वाटप करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २५ हजार ४०५ सभासदांना १२५ कोटी ५२ लाख रुपये, राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे ९ हजार ७८८ सभासदांना ६२ कोटी रुपये, ग्रामीण बँकेतर्फे ४५३ सभासदांना ३ कोटी ३० लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शासनाने ७५ कोटी रुपये कर्ज वाटपसाठी मंजूर केले आहेत. मात्र काही अटींमुळे बँकेला ही रक्कम मिळालेली नाही. बँकेची ही आíथक स्थिती पाहता सहकार खात्याने पुढाकार घेतला आहे. बँकेचे ३५ हजार सदस्य कर्जासाठी पात्र आहेत. त्यापैकी २५ हजार अर्ज बँकेने मंजूर केले आहेत. त्यापैकी दहा हजार शेतकऱ्यांना बँकेने पूर्ण कर्ज दिले आहे. काहींना दहा हजार रुपयेच कर्ज दिले आहे. शिल्लक दहा हजार अर्जापैकी सहा हजार अर्ज संबंधितांच्या जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेकडे पाठविण्यात आले आहेत. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वाटप न केलेले व बँकेकडे कर्जासाठी अर्ज सादर न केलेल्या १६ हजार २७ सभासदांना राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज वाटप होण्यासाठी काही उपाययोजना सहकार खात्यातर्फे करण्यात आल्या आहेत, असे  जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे यांनी सांगितले. जिल्ह्य़ातील १५७ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखेतील एकूण पात्र २६ हजार खातेदारांसाठी ६१ संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ८९ मेळावे घेण्यात आले. सध्या ५ हजार ९०३ अर्ज तयार असून त्यापकी १ हजार ३८ अर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडे सादर करण्यात आले. २९५ सभासदांचे अर्ज मंजूर झाले असून ही रक्कम १ कोटी ६० लाख रुपये आहे. सेवा सहकारी संस्थाचे सर्व पात्र सभासदांचे अर्ज ३० मेपर्यंत तयार करून राष्ट्रीयकृत बँकांना सादर करण्यात येतील. सेवा सहकारी संस्था नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांना जोडण्यात आल्या आहेत. कर्ज वाटपासाठी कुणी वंचित राहू नये, यादृष्टीने शासन काळजी घेत आहे. थोडा उशीर होत असला तरी सहकार्य करण्याचे आवाहनही वालदे यांनी केले.

Story img Loader