यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक सेवा विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संप्रेषण व दूरशिक्षण क्षेत्रातील एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. शिक्षणक्रमाचे प्रवेश २८ जानेवारीपासून सुरू झाल्याची माहिती या विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद बियाणी यांनी दिली. गडचिरोली येथील अॅड. एन.एस. गंगुवार शिक्षण महाविद्यालयात या शिक्षणक्रमाचे अभ्यास केंद्र सुरू असून तेथे विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. हे शिक्षणक्रम संप्रेषण व दूरशिक्षण क्षेत्रातील असून विषय संप्रेषण क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी संपादन करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांना दोन रिफ्रेशर कोर्समधून सूट मिळेल, असे परिपत्रक महाराष्ट्र शासनाने जारी केले आहे.  हे शिक्षणक्रम शैक्षणिक सेवा विभागामार्फत गेल्या वीस वर्षांपासून महाराष्ट्रभर राबविले जात आहेत. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीस पात्र असलेल्या विद्यालयीन शिक्षकांना गुणवत्ता वाढीसाठी हे शिक्षणक्रम उपयुक्त आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-२२३००४७ किंवा २२३००१० या दूरध्वनी क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा.