स्वीकृत नगरसेवक पदासाठी सत्ताधारी व विरोधी गटाकडून दाखल उमेदवारी अर्ज पीठासन अधिकारी प्रांताधिकारी अनिल भंडारी यांनी कोणतेही सबळ कारण न देता फेटाळून लावत सभा तहकूब केल्याचे जाहीर केल्याने येथील पालिका सभागृहात एकच गदारोळ उठला. नगराध्यक्षांसह इतर नगरसेवक व माध्यम प्रतिनिधींना सभागृहात प्रवेश नाकारल्याने त्यांनी पीठासन अधिकाऱ्यांचे शासकीय वाहन अडवून त्यांचा निषेध केला.
स्वीकृत सदस्य जाहीर शेख यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सत्ताधारी पक्षातर्फे अ‍ॅड. राजेश कुलकर्णी आणि विरोधी गटातर्फे संतोष सोनार यांनी अर्ज दाखल केले होते. विशेष सभेप्रसंगी प्रांताधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थेतील पाच वर्षे कामाचा अनुभव नसल्याचे कारण देत अ‍ॅड. कुलकर्णी यांचा तर सोनार यांचा अर्ज तांत्रिक कारण दाखवून बाद केला. आपण १९८९ पासून शहादा न्यायालयात वकिली करत असून आपल्याकडे सनद आहे असा युक्तीवाद अ‍ॅड. कुलकर्णी यांनी केला. परंतु पीठासन अधिकाऱ्यांनी तो ग्राह्य़ धरला नाही. दोनपैकी एक जागा विरोधी गटाला मिळावी ही मागणीही त्यांनी फेटाळून लावली.
सत्ताधारी काँग्रेसकडे १७ तर विरोधी गटात राष्ट्रवादीकडे पाच शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे. छाननी  होण्यापूर्वी भंडारी यांनी नगराध्यक्ष संगीता पाटील यांच्यासह इतर महिला नगरसेवक व पत्रकारांना तुमचे इथे काम नाही. तुम्ही सभागृहाबाहेर जा, असे फर्मावले. त्यामुळे वातावरण अधिकच तापले. त्यात कोणतेही सबळ कारण न देता   अर्ज बाद ठरवून सभा तहकुब केल्याने त्यात भर पडली.
सभा तहकूब करण्याची समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने प्रांताधिकाऱ्यांचे शासकीय वाहन नगराध्यक्षा संगीता पाटील, त्यांचे पती माजी नगराध्यक्ष विजय पाटील व इतर नगरसेवकांनी अडविले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नगराध्यक्षांना मानहानीकारक वागणूक दिल्याबद्दल जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रांताधिकाऱ्यांविरुद्ध निवेदन देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा