‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियाना’ला मुहूर्त न सापडल्याने अखेर पालिका प्रशासनाने दस्तक वस्ती योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. तसेच गेले दोन महिने थकलेले वेतन दत्तक वस्ती योजनेतील कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार आहे. गलिच्छ वस्त्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने २००१ मध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दत्तक वस्ती योजना सुरू केली. या योजनेला २०११ पर्यंत तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. २०११ मध्ये पुन्हा स्थायी समितीने या योजनेला एक वर्षांची मुदतवाढ दिली. तसेच स्वयंसेवकांचे मानधनही वाढविण्यास मंजुरी देण्यात आली. ही मुदत ३१ ऑगस्ट २०१२ रोजी संपुष्टात आली. मात्र वस्त्यांमधील सफाईचा प्रश्न कायम असल्यामुळे या योजनेला ३१ जानेवारी २०१३ पर्यंत पाच महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. गेले दोन महिने स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांचे वेतन थकले होते. आता या योजनेला मुदतवाढ देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिल्यामुळे स्वयंसेवकांच्या पदरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांचे वेतन पडणार आहे. या योजनेअंतर्गत ७,६४३ स्वयंसेवक कार्यरत असून त्यांना दरमहा ४,९५० रुपये मानधन देण्यात येते. या योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ दिल्यामुळे महापालिकेला सुमारे १८ कोटी रुपये खर्च येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी दिली.