कोळसा व पाणी मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने या जिल्ह्य़ातील धारीवाल, ग्रेस, सिध्दबली, गोपानी व गुप्ता पॉवर प्रोजेक्ट अजूनही सुरू झालेले नाहीत. वाळू टंचाईमुळे महाऔष्णिक वीज केंद्राच्या एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. पोलाद उद्योग व वरोरा येथील जीएमआर वीज प्रकल्प विक्रीसाठी काढला आहे. चुनखडी व वाळू टंचाईमुळे पाच सिमेंट कारखान्यात केवळ ४० टक्के उत्पादन होत आहे. अ‍ॅडव्हांॅटेज विदर्भाचा सर्वत्र गवगवा होत असतांना या जिल्ह्य़ातील उद्योगांवर सध्या संक्रांत आहे.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरात बल्लारपूर पेपर मिल, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाच सिमेंट उद्योग, २३४० मेगाव्ॉटचा वीज प्रकल्प, येऊ घातलेले नवीन वीज प्रकल्प, पोलाद कारखाने व त्यालाच जोडून वाहतूक व्यवसायही आहे. २१ लाख लोकसंख्येच्या या जिल्ह्य़ात तब्बल ८ लाख कामगार आहे. त्या तुलनेत केवळ दीड लाख शेतकरी आहे. अ‍ॅडव्हॉंटेज विदर्भाचा सर्वत्र गवगवा होत असतांना या जिल्ह्य़ातील उद्योगांवर संक्रात आली आहे. प्रदूषणामुळे उद्योगबंदी असलेल्या या जिल्ह्य़ात गेल्या तीन वर्षांत एकही नवीन उद्योग आलेला नाही. याउलट, जे मोठे उद्योग आहेत तेही बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. वरोरा येथे जीएमआर कंपनीचा ११०० मेगाव्ॉटचा वीज प्रकल्प वीज प्रकल्पावर मोठय़ा प्रमाणात खर्च होत असल्याने व त्या तुलनेत नफा मिळत नसल्यानेच विक्रीसाठी काढण्यात आलेला आहे. ताडाळी औद्योगिक वसाहतीतील धारीवाल वीज प्रकल्पाची ट्रायलही सुरू झाली असून दररोज ५० मेगाव्ॉट वीज निर्मिती केली जाते, परंतु वीज विक्रीचा करार झालेला नसल्याने वीज उत्पादन करून विक्री कुणाला करायची, ही समस्या या उद्योगासमोर आहे. ग्रेस, सिध्दबली, गोपानी व गुप्ता पॉवरचीही हीच समस्या आहे, तर वाळू मिळत नसल्याने महाऔष्णिक वीज केंद्रातील एक हजार मेगाव्ॉटच्या विस्तारीकरणाचे काम रखडले आहे. डिसेंबर २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार होता, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे त्याचे काम रखडले. सध्याची कामाची गती बघितली तर किमान एक वष्रे तरी हा प्रकल्प पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाने वाळूघाटांचे लिलाव अजून केलेले नसल्याने संचाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाचे आणखी ४० टक्के काम शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जिल्ह्य़ातील बहुतांश पोलाद उद्योगही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. सिध्दबली, गोपानी, ग्रेस व राजुरी स्टिल या उद्योगांना कच्चे लोखंड व आयरन मिळत नसल्याने प्लांट दीड ते दोन वषार्ंपासून बंद आहेत. सूरजागड येथील लोह खनिजाची खाण सुरू झाली तर पोलाद उद्योगाला सुगीचे दिवस आहे. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे आता ही खाण सुरू होण्याची शक्यता मावळल्यागत आहे. तिकडे सिमेंट उद्योगाला चुनखडी व वाळू मिळत नसल्यामुळे उत्पादन ४० टक्क्यांवर आले आहे. एसीसी, अंबूजा, अल्ट्राटेक, माणिकगड व मुरली अ‍ॅग्रो या पाच सिमेंट कारखान्यातून शंभर टक्के उत्पादन व्हायचे, परंतु कच्चामाल मिळत नसल्याने उत्पादन ४० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे सिमेंट विक्रेत्यांच्या धंद्यालाही त्याचा फटका बसला आहे. विदर्भात सर्वाधिक वीज प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्य़ात येत आहेत. मात्र, कोळसा व पाणी मुबलक प्रमाणात मिळू शकत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात येताच बहुतांश उद्योग समुहांनी मोठय़ा प्रोजेक्टला सध्या पूर्णविराम दिलेला आहे. एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांच्या मते तर हीच परिस्थिती कायम राहिली तर भविष्यात या जिल्ह्य़ात उद्योग येणे कठीण आहे. आज वीज दरात मोठी तफावत असल्याने छोटे उद्योग बंद पडत आहेत तेव्हा मोठय़ा उद्योगांची गरज आहे. मात्र, त्यांना कोळसा, पाणी व कच्चामाल मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत उद्योग व्यवस्थापनासमोर ना नफा ना तोटा या तत्वानुसार उद्योग सुरू ठेवण्याचे मोठे आवाहन आहे.