मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नागपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ अतुल चांदूरकर आणि झेड ए. हक यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे  मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २१ जूनला अ‍ॅड. चांदूरकर आणि अ‍ॅड. हक शपथ घेणार आहेत.
उच्च न्यायालयातील रिक्त असलेली न्यायमूर्तीची पदे भरण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन वारंवार मागणी करीत आहे. त्याचा विचार करून दोन्ही नव्या न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडेच नागपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ शरद बोबडे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर नागपूरच्या आणखी दोन विधिज्ञांना उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होण्याची संधी चालून आली आहे.
अ‍ॅड. अतुल चांदूरकर १९९२ पासून  नागपूर खंडपीठात वकिली करत आहेत तर अ‍ॅड. हक यांना १९८५ पासून वकिलीचा अनुभव आहे. अ‍ॅड. चांदूरकर  मुळचे भुसावळचे असून त्यांनी नागपुरातून बी. कॉ. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर कायद्याची पदवी पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीमधून प्राप्त केली. मुंबई उच्च न्यायालयात १९८८ साली त्यांनी वकिली सुरू केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये नागपूर खंडपीठात वकिली करणे सुरू केले. त्यांचा दिवाणी व फौजदारी प्रकरणांचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. त्यांचे वडील अ‍ॅड. पी.एन. चांदूरकर नागपूर खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि वरिष्ठ अधिवक्ता होते. त्यांचे काका एम.एल. चांदूरकर तामिळनाडू उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.  
अ‍ॅड. झेड.ए. हक मूळ अकोला जिल्ह्य़ाचे असून त्यांनी अकोल्यातून कायद्याचे शिक्षण घेतले. अकोल्यातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नागपूरमधून एलएलबीची पदवी मिळवून १९८५ साली अकोल्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. त्याचवर्षी नागपूर खंडपीठातही त्यांनी वकिली सुरू केली. अ‍ॅड. हक यांचे वडील प्रख्यात विधिज्ञ आणि आजोबा एम.एम. हक अकोल्याचे खासदार होते. नागपुरातील दोन ज्येष्ठ विधिज्ञांना मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाल्याबद्दल नागपूर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल मार्डीकर, नवनियुक्त अध्यक्ष अरुण पाटील, मावळते सचिव अ‍ॅड. अभय सांबरे आणि नवनियुक्त सचिव श्रद्धानंद भुतडा यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा