संगणक क्षेत्रातील दोन प्रचंड आव्हाने भारतासमोर आहेत. एक म्हणजे जागतिक स्पध्रेत टिकण्यासाठी आपल्याला एका सेकंदात एक अब्ज नव्हे तर एक अब्ज अब्ज ज्याला इंग्रजीत एक्झा म्हणतात, असा गणिती प्रक्रिया करणारा महा महासंगणक तयार करण्याचे मिशन हाती घ्यायचे आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भुवनेश्वर येथे २०१२च्या जानेवारी महिन्यात या मिशनची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेला अमलात आणण्यासाठी ७ हजार मेगॉवॅट वीज लागणार आहे आणि अब्जावधींचा खर्च करावा लागणार आहे. तो देशाला परवडणारा नाही. दुसरीकडे सर्वसाधारण व्यक्तीला वापरता येईल आणि अत्यंत अल्प किमतीत उपलब्ध होईल असा संगणक तयार करायचा आहे. ही दोन्ही आव्हाने कशी पेलता येतील, याचा सध्या मी विचार करीत आहे, असे प्रतिपादन महासंगणकचे जनक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
परमसंगणक, भारत एक महाशक्ती, अध्यात्म आणि विज्ञान, धर्म आणि अंधश्रद्धा, संगणक आणि इंटरनेट युगाचे फायदे आणि दुष्परिणाम, संगणक क्रांतीचे जगासमोरील आव्हान इत्यादी विविध प्रश्नांची डॉ. विजय भटकर यांनी यावेळी दिलखुलास उत्तरे दिली. केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने कोणताही देश खऱ्या अर्थाने विकास करू शकत नाही, या प्रगतीला अध्यात्माची जोड अत्यंत आवश्यक आहे. जे अध्यात्माचे प्रश्न आहेत तेच विज्ञानाचेही प्रश्न आहेत, त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ज्या मानवाच्या कल्याणासाठी आहे ते कल्याण अध्यात्माच्या अभावात साध्य होऊ शकत नाही. कारण, शेवटी मनुष्याचा विकास महत्त्वाचा आहे आणि तो केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीने होऊ शकत नाही, असेही डॉ. भटकर यांनी स्पष्ट केले. मन, आत्मा,अंत:करण, प्राण, भावना, सृष्टी व सृष्टीची निर्मिती हे सर्व प्रश्न अध्यात्माचे प्रश्न आहेत आणि त्यांचा शोध म्हणजेच सत्याचा शोध घेण्याचे काम विज्ञान करीत असते. याचाच अर्थ विज्ञान आणि अध्यात्म परस्परांना पूरक आहेत.  विज्ञानाशिवाय अध्यात्म आणि अध्यात्माशिवाय विज्ञान निर्थक आहे. दोन्हीची सांगड लावल्यानेच पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते. विज्ञानाला विवेकाची जोड दिल्याशिवाय माणसाची उन्नती होऊ शकणार नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अतिरेकी दुरुपयोगामुळे एकविसाव्या शतकात मानव जातच शिल्लक राहील की नाही याची मला भीती वाटते, म्हणूनच ती दूर करण्यासाठी अध्यात्म हा एक उपाय आहे. धर्म आणि अध्यात्म यांचा स्वीकार कोणत्याही अंधश्रद्धेतून मी केलेला नाही. विज्ञान आणि अध्यात्म यांची फारकत करणाऱ्यांच्या अपूर्ण ज्ञानामुळे आजचे अनंत प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही डॉ. भटकर यांनी सांगितले. भारत आजच जगातील एक महासत्ता असलेला देश आहे. आíथक क्षेत्रात भारताची प्रगती झाली असून जगात सर्वात जास्त अभियंते भारतानेच निर्माण केले आहेत. सर्व अभियंते तरुण असून ही तरुणाईच भारताला प्रगतिपथावर नेण्यात सर्वात मोठे योगदान देत आहे, याचा डॉ. भटकर यांनी गौरवाने उल्लेख केला. या प्रसंगी संस्थेचे सचिव शीतल वातिले तसेच प्राचार्य कळसपूरकर इत्यादी हजर होते.